चोरट्यांची मजल स्मशानभूमीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:26+5:302021-09-21T04:19:26+5:30
वाघडू, ता. चाळीसगाव : येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तोडून साडे सतरा हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध ...

चोरट्यांची मजल स्मशानभूमीपर्यंत
वाघडू, ता. चाळीसगाव : येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तोडून साडे सतरा हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, वाघडू येथील स्मशानभूमीच्या भिंतीवरील लोखंडी अँगल तारेच्या कुंपणाचे काम सन २००९-१० साली ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आले होते. दरम्यान, रविवार रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्मशानभूमीतील लोखंडी अँगल तोडून भंगार विक्रेत्याला विक्री केल्याची गंभीर स्वरूपाची बाब उघडकीस आली. याबाबत ग्रामसेवक सुनील पवार व ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील यांना गावात भंगार विक्रेत्याच्या गाडीत सदर लोखंडी अँगल दिसून आले. याबाबत भंगार विक्रेत्याकडे विचारणास केली असता त्याने स्मशानभूमीजवळील वस्तीतून खरेदी केली असल्याचे सांगितले. ग्रामसेवकांनी अधिक माहिती विचारली असता भंगार विक्रेत्यांनी
छगन मानसिंग गायकवाड, सोमनाथ छगन गायकवाड, अर्जुन छगन गायकवाड व जगन गायकवाड यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. एकूण साडेसतरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुनील जगन्नाथ पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीसठाण्यात वरील चौघांसह भंगार विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.