The thief returned the stolen goods | चोरीचा ऐवज चोरानेच केला परत

चोरीचा ऐवज चोरानेच केला परत


चाळीसगाव : चोराने एखाद्या घरात चोरी केली आणि चोरलेला किंमती ऐवज परत केल्याचे आतापर्यंत कधी ऐकले नाही. मात्र चाळीसगाव तालुक्यात अशी घटनाघडली आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने अ‍ॅल्युमिनीयमच्या डब्यात ठेवलेले दोन लाख ८२ हजार रुपए किंमतीचे सोन्याचे दागिने घराचे कुलूप तोडून लंपास केल्याची घटना तालुक्यातील न्हावे येथे घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांनाच चोरलेली रोकड व सोन्या चांदीचे दागिने असलेली पिशवी ज्या घरातून चोरी केली होती त्याच घराच्या दरवाजाजवळ आणून टाकल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी हे दागिणे व रोकड संबंधीत महिलेला परत केली आहे.
या घटनेची माहिती अशी की, न्हावे येथील पुष्पाबाई संभाजी पाटील या १६ रोजी सायंकाळी चाळीसगाव येथे आल्या. त्या रात्रभर चाळीसगाव येथेच मुक्कामी होत्या. दुसऱ्या दिवशी १७ रोजी सकाळी त्या आपल्या गावी गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले व मधल्या खोलीतील लोखंडी भांडे ठेवण्याचे रॅकमध्ये ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या डब्यातील १५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८२ हजार ५०० रुपए किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी पुष्पाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरु असतांनाच २० रोजी कोणीतरी अज्ञात चोराने पैसे व सोन्याचे दागिणे असलेली एक प्लास्टीकची पिशवी घरासमोर टाकून दिली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांचे पथकाने न्हावे येथे जावून पंचांसमक्ष ते दागिणे व रोकड असलेली पिशवी जप्त केली. त्यानंतर ते संबंधीत महिलेला पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.
पोलिसांचे पथक याबाबत सखोल तपास करीत असतांनाच न्हावे गावातीलच काहींनी ही चोरी केली असल्याच ेत्यांच्या नजरेस आले. पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यातही घेतले होते. पोलीस त्याच्या पर्यंत पोहचतील अशी भिती बहुदा चोरट्याला वाटली असावी आणि कारवाईच्या भितीने त्याने हे चोरलेले रोकड व दागिने परत केले असावे, असा अंदाज आहे.

Web Title: The thief returned the stolen goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.