पावणेचार कोटींचे 'ते' व्हेंटिलेटर अखेर नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:57+5:302021-08-21T04:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून झालेल्या वादग्रस्त व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात अखेर चौकशी समितीच्या अहवालावरून सर्व खरेदी प्रक्रिया ...

पावणेचार कोटींचे 'ते' व्हेंटिलेटर अखेर नाकारले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून झालेल्या वादग्रस्त व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात अखेर चौकशी समितीच्या अहवालावरून सर्व खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी याबाबत तक्रार दिली होती. दिनेश भोळे यांनी माहिती दिल्यानुसार "लोकमत'ने सर्वात आधी या प्रकरणाला वाचा फोडली होती. त्यानंतर या प्रकरणात कारवाईच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. अखेर हे व्हेंटिलेटर नाकारून नवीन प्रक्रियेबाबत कळवावे, असे पत्र जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहे.
३ ऑगस्ट रोजी लक्ष्मी सर्जिकल या पुरवठादाराकडून आलेले व्हेंटिलेटर हे जेईएम पोर्टलवर नोंदीपेक्षा वेगळे असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. त्यानंतर विचारणा केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सर्वात आधी पुरवठादारांना नोटीस काढण्यात आली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत दिले होते. अहवालानंतर स्पेसिफिकेशनमध्ये मोठी तफावत आढळत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
कोट
तांत्रिक समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार स्पेसिफिकेशनमध्ये मोठी तफावत असल्याचे आढळते. त्यानुसार खरेदी प्रक्रिया रद्द करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना कळविले आहे. या अहवालाचा अभ्यास करून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
‘लोकमत’चा पाठपुरावा
३ ऑगस्ट रोजी लोकमतध्ये वृत्त प्रसिद्ध
५ ऑगस्ट रोजी चौकशी समिती स्थापन
१७ ऑगस्ट समितीने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे अहवाल दिला
१८ जिल्हा शल्यचिकित्सकांनी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला
१९ ऑगस्ट रोजी ही खरेदी प्रक्रिया रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र