-वासेफ पटेल, भुसावळ जळगाव-जालना या १७४ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या कामासाठी जालना, भोकरदननंतर आता जळगाव जिल्ह्यातूनदेखील वेग आला आहे. या मार्गावर तब्बल १७ रेल्वे स्थानक असतील. यात जिल्ह्यातील नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रूक, पहूर, वाकोद अशा सहा स्थानकांचा समावेश असेल. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा देखील तयार करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या रेल्वेमार्गासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी राज्य सरकारने यापूर्वीच ५० टक्के खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तर केंद्र सरकारने १० ऑगस्ट २०२४ रोजी यास मंजुरी दिली आहे. यापैकी जालना जिल्ह्यात पाच हजार कोटी रुपये खर्च होतील. यातील चार हजार कोटी प्रत्यक्ष बांधकाम तर एक हजार कोटी रुपये भूसंपादनावर खर्च होतील.
९३५ हेक्टर जमीन भूसंपादन
१७४ किलोमीटरपैकी जवळपास १४० कि.मी. चा मार्ग जालना जिल्ह्यातून जाईल. यात जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. या रेल्वे मार्गासाठी सुमारे ९३५ हेक्टर जमीन भूसंपादन करावी लागणार आहे. ७ हजार १०६ कोटी रुपयांचा खर्च या रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी लागणार आहे.
नशिराबाद, धानवड, नेरी, सुनसगाव बुद्रुक, पहूर, वाकोद, अजिंठा लेणी, अन्वी, सिल्लोड, भोकरदन, सायगांव, केदारखेड, राजूर, बवणेपंगरी, पिंपळगांव, नागेवाडी, दिनागांव दरम्यान या मार्गावर १३० छोटे पूल, तीन नद्यांवर मोठे पूल, तीन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीला जळगावहून रेल्वेने जालना जाण्यासाठी मनमाडमार्गे फेऱ्याने जावे लागते, जळगाव-जालना व्हाया मनमाड ३३६ किलोमीटर अंतर आहे. नवीन रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यास फक्त १७४ किलोमीटर एवढाच प्रवास करावा लागणार आहे. यामुळे प्रवासाचे प्रवासाचा अंतर आणि भाडेही कमी लागणार आहे.