तरसोद गणपतीचे होणार ऑनलाईन दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:02+5:302021-09-08T04:21:02+5:30
जळगाव : गणेशोत्सवात दर्शनासाठी जळगाव आणि परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक दररोज तरसोद गणपती मंदिर, पद्मालय येथे जात असतात. मात्र, ...

तरसोद गणपतीचे होणार ऑनलाईन दर्शन
जळगाव : गणेशोत्सवात दर्शनासाठी जळगाव आणि परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक दररोज तरसोद गणपती मंदिर, पद्मालय येथे जात असतात. मात्र, गेल्या वेळी कोविडच्या साथीच्या काळात मंदिरे बंद होती. यंदाही मंदिरे बंदच असणार आहेत. मात्र, श्री गणपती मंदिर संस्थान, तरसोदने यंदा ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संस्थानची वेबसाईट आहे. सोबतच यंदा मोबाईल ॲपदेखील लाॅन्च करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकतेच या ॲपचे लॉन्चिंग केले. तसेच ऑनलाईन देणगीदेखील स्वीकारली जाणार आहे.
संस्थानचे सहयोगी सभासद अश्विन सुरतवाला यांनी सांगितले की, संस्थानतर्फे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासोबतच ऐनवेळी येणाऱ्या भाविकांना बाहेरच्या चॅनेल गेटमधून दर्शन घेता येईल. मात्र, मंदिरात कुणालाही प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी तेथे सुरक्षा व्यवस्था असेल. तसेच स्वयंसेवक देखील नियुक्त करण्यात येतील.’
काय आहे मंदिराचा इतिहास
नशिराबाद, तरसोद आणि मुरारखेडा या तीन गावांच्या सीमेवर हे मंदिर वसले आहे. हे पुरातन मंदिर आहे. १६६२ मध्ये पहिल्यांदा याची स्थापना करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिराच्या परिसरात वड आणि चिंचेची मोठी झाडे आहेत. तसेच मागच्या बाजूला पायविहीर पायऱ्या बुजून टाकलेल्या अवस्थेत आहे. या गोष्टी मंदिर पुरातन असल्याची साक्ष देतात. १९८० मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आला.