रोहिण्यात केली घाई, मृगात पाणी नाही, कपाशीची होते लाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:37+5:302021-06-16T04:22:37+5:30
आडगावसह परिसरात रोहिणी नक्षत्रात दोन, तीन पावसाने जोरदार सलामी दिल्याने परिसरातील ७ ते ८ गावांतील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या चांगुलपणाचा फायदा ...

रोहिण्यात केली घाई, मृगात पाणी नाही, कपाशीची होते लाही
आडगावसह परिसरात रोहिणी नक्षत्रात दोन, तीन पावसाने जोरदार सलामी दिल्याने परिसरातील ७ ते ८ गावांतील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या चांगुलपणाचा फायदा घेत, शेतात पांढरे सोन्याची तयारी केली. नुसती तयारीच न करता, आजमितीला फक्त कोरडवाहू शेतकऱ्याचीच कपाशी लावणे बाकी असून, बागायती कपाशीची लागवड जवळजवळ ९५ टक्के झाली आहे. साधारणतः कुणाचे २० दिवसांचे, कुणाचे १५ दिवसांचे, तर कुणाचे १० दिवसांचे कपाशी शेती झाले आहे. रोहिणी नक्षत्र दमदार बरसल्याने पुढील मृग नक्षत्रही चांगले असेल, म्हणून शेतकऱ्यांनी आगा-पिछा न पाहता, बिनधास्त लागवड करून टाकली. ज्यांची कपाशी १५ ते २० दिवसांची झाली, त्यांनी कोळपणी व निंदणी करून घेतली. कोळपणीमुळे जमिनीची ओल तुटल्याने पीक पाण्यावाचून कडक उन्हामुळे व्याकूळ झाले आहे.
गेल्या आठवड्यात ‘मान्सूनपूर्व पावसाची कमाल अन् शेतकऱ्यांची धमाल’ या शीर्षकाखाली बातमीमध्ये पावसाच्या आणि पिकांच्या परिस्थितीविषयी शेतकऱ्यांनी लक्ष वेधले होते. त्यात महत्त्वाचा मुद्दा रोहिण्या ओल्या केल्या, पुढे काय माहीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतकऱ्यांच्या मते रोहिण्यामध्ये पाऊस बरसा की, पुढे मृग नक्षत्रात हुलकावणी देतो. अगदी तसाच अनुभव सध्या परिसरातील शेतकऱ्यांना येत आहे. रोहिण्यांमध्ये दमदार पाऊस झाल्याने, कपाशी लागवडीचा कार्यक्रम उरकून घेतला. या वर्षी निसर्गाची मेहेरबानी चांगली दिसते, पुढेही चांगलेच होईल, म्हणून शेतकऱ्यांनी आर्थिक भार शेतात टाकला, परंतु गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्राला आज बरोबर एक आठवडा झाला, तरी पावसाचा एक थेंबही नसल्याने पीक कडक उन्हामुळे व्याकूळ झाले आहे. कोरडवाहू कपाशी लागवड करणारे, तसेच पेरण्या करणारे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चाैकट
आधी आशा, आता निराशा
अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनीही मृग नक्षत्रावर भरवसा ठेवून ताबडतोब कपाशी लागवड उरकून घेतली होती. मात्र, आता मृग नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने, शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लागवड केलेल्या कपाशी पिकाचं काय होणार, असा प्रश्नच या शेतकऱ्यांना पडला आहे.
===Photopath===
150621\15jal_1_15062021_12.jpg
===Caption===
मशागत झालेले कपाशीचे पिक, दमदार पावसाची वाट पाहत आहे