‘गोलाणी’ तील त्या तलावावर कायमचा तोडगा हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:18+5:302021-06-21T04:13:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गोलाणी मार्केटमधील तळमजल्यावर साचणाऱ्या पाण्याचा समस्येचा मुद्दा ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्यानंतर शनिवारी महापौर जयश्री ...

‘गोलाणी’ तील त्या तलावावर कायमचा तोडगा हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गोलाणी मार्केटमधील तळमजल्यावर साचणाऱ्या पाण्याचा समस्येचा मुद्दा ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्यानंतर शनिवारी महापौर जयश्री महाजन यांनी गोलाणी मार्केटमधील तळमजल्याची पाहणी केली. तसेच आरोग्य विभागाला धारेवरधरत ही समस्या मार्गी लावण्याचा सूचना महापौरांनी दिल्या आहेत. मात्र, एकावेळेस पाहणी केल्यानंतर किंवा सूचना दिल्यानंतर ही समस्या मार्गी लागणार नसून, या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे.
गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात गटारीचे पाणी साचल्यामुळे हा तळमजला तलावासारखाच भासत असून, ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिध्द केल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून पाहणीचा आणि सूचनांचा सोपस्कार केला जात असतो, मात्र काही दिवसांमध्ये पुन्हा हीच परिस्थिती निर्माण होत असते. महापौर जयश्री महाजन यांनी शनिवारी गोलाणी मार्केटच्या तळमजल्याची पाहणी केली. यावेळी आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, प्रभाग समिती एकचे अधिकारी व्ही.ओ.सोनवनी, आरोग्य निरीक्षकांसह मनपाचे काही कर्मचारी उपस्थित होते.
सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने समस्या
तळमजल्यातील एकाच भगात ही समस्या निर्माण होत असते. याठिकाणच्या सांडपाण्याचा कोणताही निचरा हा होत नाही. तसेच अनेक वर्षांपासून चेंबरमधील घाण देखील साफ करण्यात आलेली नाही. मनपा कर्मचाऱ्यांनी शनिवारी व्हॅक्यूम क्लिनर व्हॅनसह यंत्रणेच्या सहाय्याने संपूर्ण चोकअप चेंबर उघडून मनपा कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्यासह तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान, या गंभीर समस्येसंदर्भात महापौर जयश्री महाजन यांनी पुन्हा सायंकाळी आपल्या दालनात आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचार्यांची बैठक बोलावून गोलाणी मार्केटमधील विविध प्रश्नांसंदर्भात कुठलीही कारणे न सांगता तेथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासंदर्भात तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले. दरम्यान, याठिकाणचा सांडपाण्याचा निचरा हा कायमस्वरुपी होत रहावा यासाठी अभियंत्यांना पाहणी करून, आठवड्याभरात समस्या मार्गी लावण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.