शौचालय नसल्यास दाखले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:37 IST2017-03-07T23:37:01+5:302017-03-07T23:37:01+5:30
ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबास ग्रामपंचायतर्फे कुठलाही दाखला न देण्याचा ठराव करण्यात आला आहे.

शौचालय नसल्यास दाखले नाही
निजामपूर : साक्री तालुक्यातील खुडाणे येथील ग्रामपंचायतीने वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबास ग्रामपंचायतर्फे कुठलाही दाखला न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या ग्रामस्थांकडे शौचालय नाही, त्यांनी शौचालय बांधावे, याबाबत गावात जनजागृती केली जात आहे. खुडाणे गावात एकूण ३२० कुटुंब आहेत. सन २०१५ पर्यंत फक्त ९० स्वच्छतालये होती. २०१५-१६ मध्ये ७० स्वच्छतालये बांधण्यात आली. आता १२ हजार रुपयांच्या अनुदान वाटपानंतर १०० स्वच्छतालयांचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव सुकदेव गवळे, ग्रामसेवक एन. डी. मोहिते यांनी मोबाइलद्वारे संदेश देणे, घरोघरी जाऊन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामस्थांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे पराग माळी यांनी नमूद केले.
सन २०१८ पर्यंत पूर्ण गावात घरोघरी स्वच्छतागृह बांधण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायततर्फे सांगण्यात येत आहे.