लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाच्या मार्केटची मुदत संपून आता आठ वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला असून, आता गाळेधारकांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकीत भाड्याच्या रक्कमेसह नुकसानभरपाईची रक्कम देखील भरावीच लागणार असल्याचे स्पष्ट बोल मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले आहेत. नुकसान भरपाईसह भाड्याची रक्कम भरण्याशिवाय पर्याय नसून, शासनाच्या कोणत्याही आदेशापर्यंत मनपा प्रशासन वाट पाहणार नाही असाही इशारा आयुक्तांनी दिला आहे.
मंगळवारी मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. यावेळी डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, पंकज मोमाया, युवराज वाघ, तेजस देपुरा, संजय पाटील यांच्यासह अनेक गाळेधारक उपस्थित होते. मुदत संपलेल्या मार्केटमधील १४ अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांची स्थिती हालाकीची असून, मनपाने बजावलेले भाडे हे गाळेधारक भरू शकणार नसल्याचे डॉ.शांतारा सोनवणे यांनी सांगितले. तसेच शासनाकडून याबाबत धोरण निश्चित केले जाणार असून, शासनाच्या निर्णयापर्यंत गाळेधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.
कर्मचाऱ्यांची थकबाकी, विकासाचे कामे कशी करायची
गाळेधारकांची मागणी ऐकून मनपा आयुक्तांनी पैसे भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. तसेच मनपाची परिस्थिती बेताची असून, मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन, थकीत भत्ते, शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मुलभुत सुविधांसाठी निधी आणायचा कोठून ? असा प्रश्न आयुक्तांनी केला. महावितरणच्या बीलांची रक्कम भरायची आहे. त्यासाठी मनपाकडे निधी नाही, अशा परिस्थितीत मनपा मालकीच्या उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या गाळेधारकांकडून थकीत भाड्याची रक्कम वसुल करावीच लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
गाळेसील करण्याची कारवाई आजपासून ?
मनपा प्रशासनाकडून बुधवारपासून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळे सील करण्याची कारवाई सुरु होण्याची शक्यता असून, मनपाने याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. मनपा अधिकारी व इतर विभागप्रमुखांना देखील उपस्थित राहण्याचा सूचना दिल्या असून, मनपा आता मोठ्या कारवाईच्या पावित्र्यात असल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.