दोन आठवडे उलटूनही कॉन्सन्ट्रेटरची चौकशी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:07+5:302021-09-02T04:36:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बाजारात २५ ते ३० हजारात मिळणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जिल्हा रुग्णालयाने प्रभंजन ऑटोमोबाईलकडून तब्बल ...

दोन आठवडे उलटूनही कॉन्सन्ट्रेटरची चौकशी नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाजारात २५ ते ३० हजारात मिळणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जिल्हा रुग्णालयाने प्रभंजन ऑटोमोबाईलकडून तब्बल सव्वा लाखात खरेदी केल्याच्या तक्रारीच्या प्रकरणात दोन आठवडे उलटूनही याच्या चौकशीला सुरूवात झाली नसल्याची बाब समोर आली आहे. या कॉन्सन्ट्रेटरची स्पेसिफिकेशन तपासणीच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या होत्या.
सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी याची जबाबदारी प्रशासन अधिकारी डॉ. यू. बी. तासखेडकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली सरोदे यांच्याकडे सोपविली होती. मात्र, या चौकशीला अद्याप सुरुवात झालेली नसून अहवाल सादर होणार कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या चौकशी समितीवर तक्रारदार दिनेश भोळे यांनी आधीच आक्षेप नोंदविला आहे. या समितीत तज्ज्ञच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अंदाज समितीसह जिल्हा नियोजन समितीच्या सभेतही ही खरेदी प्रक्रिया चांगलीच गाजली. मात्र, खरेदी प्रक्रिया रद्द केल्यानंतर ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडून ही प्रक्रिया राबविण्यत आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यासह लक्ष्मी सर्जिकल या पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, त्यांच्या अन्य खरेदींची चौकशी करावी, अशी मागणी भोळे यांनी केलेली आहे.
व्हेंटिलेटर बाबतही कारवाई नाही
निविदा रद्द केल्यानंतर अद्याप व्हेंटिलेटर खरेदी प्रकरणात कारवाईबाबत कोणत्याच हालचाली झालेल्या नसल्याची माहिती आहे. याबाबत तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली होती. दोन दिवसात हा अहवाल आरेाग्य विभागाकडे पाठविण्यात येईल, अन्य तक्रारींची चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांना त्यावेळी देण्यात आले होते.