कोविड संपताच नोकरी जाण्याची असते भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:23+5:302021-06-26T04:12:23+5:30
कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा : पहिल्या लाटेनंतर ६० टक्के कर्मचाऱ्यांना केले होते कमी स्टार ८५० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

कोविड संपताच नोकरी जाण्याची असते भीती
कंत्राटी कर्मचाऱ्यांची व्यथा : पहिल्या लाटेनंतर ६० टक्के कर्मचाऱ्यांना केले होते कमी
स्टार ८५०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या महामारीत आपला जीव पणाला लावून कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोविड कमी होताच नोकरी जाण्याची एक भीती असून यातच त्यांना दैनंदिन काम करावे लागत आहे. पहिल्या लाटेचा विचार केला तर पहिली लाट ओसरल्यानंतर तब्बल ६० टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. गंभीर बाब म्हणजे या कोरोना योद्ध्यांचे गेल्या महिना-दोन महिन्यांपासून वेतनही रखडले आहे.
कोविडची पहिली लाट आल्यानंतर मनुष्यबळाची मोठी कमतरता आरोग्य यंत्रणेत होती. यात डॉक्टर, नर्स, डाटा एंट्री ऑपरेटर, तंत्रज्ञ अशी विविध पदे जिल्हाभरात त्यावेळी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली होती. यावेळी भरलेल्या काही पदांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. मात्र, दुसरी लाट येताच त्यांना पुन्हा कामावर बोलावून घेण्यात आले. त्यामुळे गरज असेल तेव्हा बोलवायचे आणि नंतर कामावरून काढून टाकायचे असा व्यवहार सुरू असल्याची व्यथा या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. दरम्यान, कामावर कायम करण्यासह किमान ११ महिन्यांचा करार असावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांमधून समोर येत आहे. कधीही बोलवायचे आणि कधीही कामावरून काढून टाकायचे अशा प्रकारामुळे मानसिकताच नव्हे तर कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बिकट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पहिली लाट
किती कर्मचारी घेतले : ७५०
किती कर्मचारी कमी केले : ४००
दुसरी लाट
किती कर्मचारी घेतले : १०० (कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावले)
किती कर्मचारी कमी केले : ००
गरज सरो अन् वैद्य मरो
महिनाभरापासून पगार रखडला असून गरज असते तेव्हा आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत थांबून मेहनतीने जबाबदारी पार पाडत असतो, आणीबाणीच्या काळात आम्ही सेवा देत असताना गरज संपल्यानंतर कमी केले जाते, अशामुळे आर्थिक परिस्थिती बिघडत असून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करायला हवा. -बापूसाहेब पाटील, कंत्राटी कर्मचारी
कोविडच्या अगदी संसर्गाच्या काळात आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न डगमगता सेवा दिली. पूर्ण वेळ, पूर्ण प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळली, मात्र, कोविड संपल्यानंतर नोकरी जाण्याची सर्वांनाच भीती लागून असते. त्यामुळे गरज असल्यावर बोलवा नंतर काढून टाका, यामुळे मानसिकता खराब होत असते. - स्वप्निल पाटील, कंत्राटी कर्मचारी
आम्ही कोविडच्या काळात पूर्ण वेळ काम केले आहे. शासनाने याचा विचार करावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. जेव्हा कोणी काम करायला पुढे येत नव्हते, तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. शासनाने याचा विचार करावा. - एक कंत्राटी कर्मचारी
मनुष्यबळाचा मुद्दा सोडविण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेत कोणत्याच कर्मचाऱ्याला कमी करण्यात आलेले नाही. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक