तेव्हा भीती होती..आता बेफिकीरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:30+5:302021-03-28T04:15:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून रविवारी एक वर्ष होणार आहे. २८ मार्च २०२० रोजी ...

तेव्हा भीती होती..आता बेफिकीरी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून रविवारी एक वर्ष होणार आहे. २८ मार्च २०२० रोजी हा रुग्ण आढळल्यानंतर प्रचंड भीतीचे वातावरण होते. शहरात प्रचंड शांतता पसरली होती. आता रुग्णसंख्या १ वरून ८० हजार झाली आहे. कोरोनाची भीती मध्यंतरी पूर्णत: नष्ट झाली होती. मात्र, काही कालांतराने बेफिकीरी वाढल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर झाल्याने व बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोनाची दहशत पसरली आहे.
नेत्र कक्षात दाखल
पहिला रुग्ण हा मेहरूण परिसरातील रहिवासी असून हा रुग्ण मुंबई येथून प्रवास करून जळगावात दाखल झाला होता. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होण्या आधी हा रुग्ण चार ते पाच दिवस खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र कक्षात दाखल करण्यात आले हाेते. २८ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास या पहिल्या रुग्णाचा रिपोर्ट बाधित आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
तेव्हा काहीच नव्हते स्पष्ट
पहिला रुग्ण आढळल्यानंतर रुग्णालयात तर प्रचंड दहशत हाेती. बराच वेळ कर्मचारीही या रुग्णाच्या जवळ जात नव्हते. एक दोन दिवसांनी हळू हळू कर्मचारी त्याच्या जवळ जावून सेवा देऊ लागले होते. या परिसरातही जायला लोक घाबरत होते. शहरात पूर्णत: संचारबंदीसारखे वातावरण होते. औषधोपचारांचा प्रोटोेकॉल माहित होता. अन्य उपाययोजना सर्वांसाठी अत्यंत नवीन होत्या. दिशा स्पष्ट नव्हती, त्यामुळे भीती अधिक होते
वर्षभरानंतर बेफिकीरी वाढली
वर्षभरात औषधोपचारांची दिशा बऱ्यापैकी स्पष्ट झाली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर वाढविण्यात आले आहेत. मात्र, रुग्णवाढ रोखणे आता अशक्य होत आहेत. तेव्हा पिक पिरीऐड हा शंभर दिवसांनी आला होता. आता दुसऱ्या लाटेत तो ५० दिवसांनीच आला आहे. तेव्हा क्वचित दिवसाला एक हजार रुग्ण आढळत होते, आता तर गेल्या दहा दिवसांपासून नियमीत एक हजार रुग्ण समोर येत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात आहे.
कोरोनात महत्त्वाच्या ठरलेल्या तारखा
२ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला बळी
९ सप्टेंबर २०२० रोजी एका दिवसात २० मृत्यू.
२४ मार्च २०२१ रोजी आढळले पहिल्या व दुसऱ्या लाटेतील एका दिवसातील सर्वाधिक १२२३ रुग्ण
२५ मार्च २०२१ रोजी सर्वाधिक ९९५ रुग्ण बरे झाले.
रुग्णसंख्या सुसाट....
मेपासून ऑक्टोबर पर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळले होते. दुसर्या लाटेत १५ फेबुवारीपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर आले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा या लाटेत संसर्ग अधिक प्रमाणात होत असल्याचा तज्ञांचा निष्कर्ष आहेत. मार्च मध्ये २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत. पहिल्या लाटेत सप्टेेंबर महिन्यात अधिक रुग्ण समोर आले होते.
लसीकरणाचा दिलासा..
कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून यात १ लाख ५ हजार लोकांनी याचा पहिला डोस घेतला आहे. शिवाय १ एप्रिलपासून नवीन निकषानुसार अधिक नागरिक लस घेऊ शकणार आहेत.