दानपेट्यांसह पुजेच्या साहित्याची चोरी
By Admin | Updated: May 21, 2014 01:30 IST2014-05-21T01:30:25+5:302014-05-21T01:30:25+5:30
घोडदे येथील देवस्थानातील दान पेट्यांसह चादरी, पुजेचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली.

दानपेट्यांसह पुजेच्या साहित्याची चोरी
भडगाव : घोडदे येथील देवस्थानातील दान पेट्यांसह चादरी, पुजेचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. मात्र याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. चोरीच्या वाढत्या प्रकारांमुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. घोडदे देवस्थान भडगाव शहरापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. याठिकाणी पीर गैबनशहा बाबा व मारुती मंदिर आहे. हे देवस्थान हिंदू-मुस्लीम बांधवाचे जागृत देवस्थान व एकतेचे प्रतीक मानले जाते. शेकडो भाविक या ठिकाणी नेहमी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. दरवर्षी यात्रोत्सवही भरतो. या देवस्थानातील एक दानपेटी अज्ञात चोरट्यांनी तोडून पोबारा केला तर जमिनीत असलेल्या एका दानपेटीचा पत्रा तोडून दक्षिणा लंपास केली. तसेच शेजारील खोलीचे कुलूप तोडून चादरींसह पुजेचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात चोरून नेले. ही घटना १६ रोजी शुक्रवारी भरणार्या आठवडे बाजाराच्या दिवशीच घडल्याची माहिती या देवस्थानचे पुजारी फकीर हिनायत शहा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. मागील महिन्यातही शहरातील बाजारपेठेतील चौकातील श्रीराम मंदिरातून मूर्ती चोरीस गेल्याची घटना घडली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे. (वार्ताहर)