दहावीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण; प्रतीक्षा निकालाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:56+5:302021-07-15T04:12:56+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांनी पूर्ण केली आहे. ...

दहावीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण; प्रतीक्षा निकालाची
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांनी पूर्ण केली आहे. दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे, या शासन परिपत्रकाचे नीट वाचन न केल्यामुळे बऱ्याच शाळांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. अशा शाळांना तात्काळ त्रुटी दुरुस्त करून मूल्यांकन सादर करण्याच्या सूचना बोर्डाने दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यार्थ्यांचे नववीतील गुण आणि वर्षभरातील कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या मूल्यांकनावरून निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांना परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अहवाल शिक्षण मंडळाकडे सादर करायचा होता. यासाठी बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले होते. मात्र, बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाचे नीट वाचन केले नाही. त्यातील मुद्दे समजून घेतले नाहीत, तसेच ८० गुणांचे मूल्यांकन करायचे असते, त्यांनी १०० गुणांचे मूल्यांकन करून बोर्डाकडे निकाल सादर केला. त्यामुळे बोर्डाने यात त्रुटी काढल्याने जिल्ह्यातील काही शाळांना पुन्हा मूल्यांकन करून ते सादर करण्यास सांगितले आहे.
दहावीचे ५८ हजार परीक्षार्थी
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते, तसेही दहावीची परीक्षा ही १३७ केंद्रांवर पार पडणार होती, तर १८ परीरक्षकांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली, तसेच दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येणार आहे.
---------------------मुख्याध्यापक म्हणतात...
शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बोर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे सविस्तर वाचन करून निकाल तयार केला. तो बाेर्डाकडे सादरसुद्धा केला असून, त्यात बोर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर केला आहे.
- चारुलता पाटील, मुख्याध्यापक
------------------------------दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया दहा ते बारा ----- पूर्ण केली आहे. कुठलीही अडचण येणार नाही. शासनाने सुचविलेली मूल्यमापनाची पद्धती अत्यंत चांगली आहे. दरवर्षी जसा निकाल असतो, त्याप्रमाणे निकाल लागेल. यंदा नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असेल.
- ज्ञानेश्वर पाटील, मुख्याध्यापक
मूल्यांकनातील त्रुटी
-निकाल कसा तयार करायचा याच्या परिपत्रकाचे काही शाळेच्या शिक्षकांनी परिपूर्ण वाचन केले नाही, त्यामुळे त्यात त्रुटी आल्या.
-निकाल कसा तयार करायचा यासाठी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बऱ्याच अडचणी आल्या.
-निकाल तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मूल्यांकन योग्य न झाल्याने बोर्डाने त्यात त्रुटी काढल्या आहेत.
------------------------------दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यांना त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांना बोर्डाकडून पत्र पाठविण्यात आले आहे, तसेच त्रुटी दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- बी.जे. पाटील, शिक्षणाधिकारी