राष्ट्रपुरुषाचे बॅनर फाडल्याने कानळदा येथे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 14:13 IST2017-04-12T14:13:08+5:302017-04-12T14:13:08+5:30
राष्ट्रपुरुषाच्या बॅनरवर मध्यरात्री दगडफेक करुन बॅनर फाडल्याने बुधवारी सकाळी कानळदा (ता.जळगाव) येथे तणाव निर्माण झाला होता.

राष्ट्रपुरुषाचे बॅनर फाडल्याने कानळदा येथे तणाव
मध्यरात्री फाडले बॅनर : मुख्य चौकात ठिय्या मांडून दगडफेक, बसेस रोखल्या
जळगाव,दि.12- राष्ट्रपुरुषाच्या बॅनरवर मध्यरात्री दगडफेक करुन बॅनर फाडल्याने बुधवारी सकाळी कानळदा (ता.जळगाव) येथे तणाव निर्माण झाला होता. सकाळी साडे सहा वाजता हा प्रकार लक्षात आल्यानंतर समाजबांधवांनी मुख्य चौकात एकत्र येऊन ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. यावेळी भोकर व जळगावकडे जाणा:या एस.टी.बसेस व अन्य वाहने दोन तास रोखून धरण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कानळदा गावातील मुख्य चौकात एका संस्थेच्या इमारतीला राष्ट्रपुरुषाचे भव्य बॅनर लावण्यात आले होते. त्यात उत्सव समितीच्या पदाधिका:यांचेही छायाचित्र होते. बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास काही टवाळखोरांनी या बॅनरवर दगड व विटांचा मारा केला, त्यामुळे बॅनर फाटले होते. आंदोलन सुरु झाल्याने व्यावसायिकांनी आपले दुकानेच उघडली नाहीत. घटनेची माहिती देऊनही दहा वाजेर्पयत पोलीस न आल्याने समाजबांधवांनी संताप व्यक्त केला. काही वेळाने नंतर तालुका पोलीस व दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकडय़ा गावात दाखल झाले. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेतली.