जळगाव : पंचायत राज समिती २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात येणार असून त्यासाठी शनिवार, रविवारीही जिल्हा परिषदेत शासकीय कामे केली जात आहेत. त्यातच पदोन्नत्यांसह विविध विषयांनी चर्चेत असलेला आरोग्य विभाग या पंचायत राज समितीत अधिक प्रकाशात राहणार असल्याने या विभागातील अधिकाऱ्यांची चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार हे तीन ते चार दिवसांपासून रजेवर गेलेले आहेत.
पंचायत राज समितीत जिल्ह्यातील आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील यांचा समावेश आहे. त्यांच्यासह ३५ आमदार या समितीत असतील. ही समिती जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा, स्थानिक पातळीवर भेटी देणार आहे. तीन वर्षांनी ही समिती येत असते. दरम्यान, कुपोषित बालकांची वाढलेली संख्या, कुपोषित बालकाचा झालेला मृत्यू तसेच रावेरातील ३४ गावांमधील दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांतील अनियमितता, आरोग्य विभागाच्या रखडलेल्या पदोन्नत्या, सॅनेटायझर घोटाळा, गौण खनिज घोटाळा अशा विविध बाबी या समितीसमोर गाजण्याची शक्यता आहे.