नियमांच्या फेऱ्यामुळे ३० कोटींच्या कामांच्या निविदा रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST2021-09-16T04:22:03+5:302021-09-16T04:22:03+5:30
पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून दिला होता ६१ कोटींचा निधी : महापालिकेला अजून मिळणार २० कोटींचा निधी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

नियमांच्या फेऱ्यामुळे ३० कोटींच्या कामांच्या निविदा रखडल्या
पालकमंत्र्यांनी डीपीडीसीतून दिला होता ६१ कोटींचा निधी : महापालिकेला अजून मिळणार २० कोटींचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याचे कारण देत मनपा प्रशासनाकडून अनेकवेळा नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. मात्र, महापालिकेकडे निधी असतानाही केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या ढीसाळपणामुळे आलेल्या निधीची विल्हेवाट मनपाकडून लावली जात नसल्याचे समोर आले आहे. नियमांच्या फेऱ्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मनपाला दिलेल्या ६१ कोटींच्या निधीपैकी ३० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया रखडली आहे.
निविदा प्रक्रिया मनपाच्या नियमांनी काढावी की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनी काढण्यात यावी याबाबत अजूनही मनपाने कोणताही निर्णय न घेतल्याने ही प्रक्रिया थांबली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. महापालिकेकडून निविदा प्रक्रिया काढली जात असताना, काही बाबी या बांधकाम विभागाच्या अटींचे पालन केले जाते. तर काही बाबी या मनपा प्रशासन आपल्याच अटींचे पालन करते. निविदा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांप्रमाणेच काढण्यात याव्यात यासाठी महापालिकेच्या महासभेत ठराव झाला आहे. मात्र, याबाबत अजूनही कोणताही निर्णय न झाल्याने निविदा काढण्याचे काम थांबले आहे.
नियमच नाही तर कामांचा दर्जाही सुधारा
मनपा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या निविदा या बांधकाम विभागाच्या नियमांप्रमाणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ निविदांचे नियमच नाही तर कामांचा दर्जाही बांधकाम विभागाच्या कामांप्रमाणेच करण्यात यावा असेही आता महापालिकेसह सत्ताधाऱ्यांना सांगितले जात आहे. तसेच बांधकाम विभागाच्या नियमांप्रमाणे निविदा काढण्याचा नियमांचा प्रस्ताव दाखल करून, मनपातील अनेकांची अनेक वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढण्याची ही सत्ताधाऱ्यांची खेळी असल्याचीही चर्चा आता महापालिकेत रंगली आहे.
मनपाला राज्य शासनाकडून मिळणार २० कोटींचा निधी
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात राग आहे. यामुळेच आता सत्ताधाऱ्यांकडून मनपाला मिळणाऱ्या प्रत्येक निधीतून केवळ रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून शासनाकडून नगरोत्थानअंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून, याबाबत बुधवारी माजी महापौर नितीन लढ्ढा व मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली.