केबल तुटल्यामुळे ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:26+5:302021-08-24T04:21:26+5:30
जळगाव : अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार बीएसएनएलची केबल तुटल्याचे ...

केबल तुटल्यामुळे ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा खंडित
जळगाव : अमृत योजना आणि भुयारी गटारींच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात येत असल्यामुळे गेल्या काही महिन्यात वारंवार बीएसएनएलची केबल तुटल्याचे प्रकार घडले. त्यात आता नवीन बस स्थानकासमोर केबल तुटल्यामुळे ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा गेल्या आठवडाभरापासून खंडित झाली आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होत असून, तक्रार करूनही दखल घेत नसल्यामुळे ग्राहकांमधून बीएसएनएलच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील नवीन बस स्थानकासमोर मनपातर्फे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत आहे. या कामासाठी गेल्या आठवड्यात जेसीबीतर्फे खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना जमिनीमधून टाकण्यात आलेली बीएसएनएलची ‘८०० टेअर’ची केबल तुटली आहे. ही केबल तुटल्यामुळे या परिसरातील घरगुती ४०० दूरध्वनी बंद पडले आहेत. यामुळे आठवडाभरापासून नागरिकांचे घरगुती फोन बंद असून, त्यात शासकीय कार्यालयांचेही दूरध्वनी बंद आहेत. त्यामुळे एकीकडे घरगुती नागरिकांची गैरसोय होत असताना, दुसरीकडे शासकीय कार्यालयामध्ये दूरध्वनीवर फोन करणाऱ्या नागरिकांचींही गैरसोय होत आहे. तर आठवडाभरानंतरही बीएसएनएल प्रशासनातर्फे ही तुटलेली केबल जोडण्यात आलेली नाही. केबल जोडून दूरध्वनी सेवा तत्काळ सुरू करण्याबाबत नागरिकांतर्फे अनेकवेळा बीएसएनएल कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आठवडाभरानंतरही केबल जोडून, दूरध्वनी सेवा सुरू न झाल्यामुळे नागरिकांतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
केबल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात
केबल जोडणीच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने बीएसएनएल तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला असता, त्यांनी मक्तेदारामार्फत केबल जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, सर्व भागातील दूरध्वनी सेवा दोन दिवसात सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.