सुनेच्या जाचाने सासूबाईंना अश्रू अनावर
By Admin | Updated: November 18, 2014 14:36 IST2014-11-18T14:36:36+5:302014-11-18T14:36:48+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित महिला लोकशाहीदिनी सुनेच्या जाचाने त्रस्त असलेल्या वृध्देला जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्यासमोर कैफीयत मांडताना अश्रू अनावर झाले.

सुनेच्या जाचाने सासूबाईंना अश्रू अनावर
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित महिला लोकशाहीदिनी सुनेच्या जाचाने त्रस्त असलेल्या वृध्देला जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्यासमोर कैफीयत मांडताना अश्रू अनावर झाले.
त्या वृध्देच्या पतीचे निधन झालेले आहे. पतीचे पेन्शन त्या वृध्देला मिळते. मात्र त्या पेन्शवरून त्यांची सून त्रास देत आहे. पेन्शनसाठीच त्यांच्या मुलाशी लग्न केल्याचे सांगून पेन्शनची मागणी करते,अशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे महिला लोकशाहीदिनी केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यांनी साधी विचारपूसही केली नाही,असे सांगत असतानाच त्या वृध्देला अश्रू अनावर झाले. त्यांचे गार्हाणे ऐकून घेत जिल्हाधिकार्यांनी पोलिसांना त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याचे आदेश दिले.
लोकशाहीदिनी ४७ तक्रारी
सोमवारी झालेल्या महिला लोकशाहीदिनी एकूण ४७ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी ठेवीदारांच्या असून ३ पोलीस आणि १ तक्रार संजय गांधी निराधार योजनेची आहे.
मर्जीतील ठेवीदारांना ठेवी परत
महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचे साकडे ठेवीदारांनी जिल्हाधिकार्यांना घातले आहे. महिलांच्या विविध पतसंस्थांमध्ये ठेवी आहेत. या पतसंस्थांची वसुली आजपर्यंत झालेली नाही काय? शासनाच्या परिपत्रकाचे पालन किती संस्थांनी केले, याबाबत सहकार विभाग लक्ष देत नाही. पतसंस्थांनी परिपत्रकाचे पालन केले असते तर महिलांना रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती. मोठय़ा प्रमाणावर वसुली होऊनही मर्जीतील ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. ठेवी वाटपाची चौकशी करा
ठेवीदारांना परत करण्यात आलेल्या संपूर्ण ठेवींबाबत चौकशी करण्याची मागणी ठेवीदारांनी लोकशाहीदिनी केली आहे. महिला ठेवीदारांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असेल तर केवळ सोपस्कार नको, न्याय हवा. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी कागदी घोडे नको तर ठोस कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी केली. यावेळी काळा हनुमान, महेश र्मचंट, जय मातादी, चंद्रकांत बढे, स्वामी नारायण, संतोषी माता, जनता अर्बन, कुबेर अर्बन, फैजपूर र्मचंट, आनंद अर्बन, महाकालेश्वर, सप्तशृंगी या संस्थांचे महिला ठेवीदार उपस्थित होते, असे संध्या चित्ते यांनी कळविले आहे.