टीम इंडियाचे ये रे माझ्या मागल्या सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:19+5:302021-09-03T04:18:19+5:30
चौथ्या कसोटीतही हाराकिरी सुरूच; चहापानापर्यंत सहा फलंदाज तंबूत लंडन : चौथ्या कसोटीत देखील भारतीय संघाची हाराकिरी सुरूच आहे. पहिल्या ...

टीम इंडियाचे ये रे माझ्या मागल्या सुरूच
चौथ्या कसोटीतही हाराकिरी सुरूच; चहापानापर्यंत सहा फलंदाज तंबूत
लंडन : चौथ्या कसोटीत देखील भारतीय संघाची हाराकिरी सुरूच आहे. पहिल्या दिवशी गुरुवारी भारताचे चहापानापर्यंत सहा फलंदाज तंबूत परतले होते. विराट कोहली (५० धावा) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताचे भरवशाचे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले.
इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फायदेशीर ठरला. पुनरागमन करणाऱ्या ख्रिस व्होक्स याने संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याने आपल्या पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर हिटमॅन रोहित शर्माला बाद केले. त्याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला रोहितने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सोपा झेल यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकडे गेला. त्यानंतर ओली रॉबिन्सन याने के. एल. राहुलला पायचीत केले. त्यावेळी संघाची अवस्था २ बाद २८ अशी झाली होती. पुजारा गेल्या सामन्यातील लय कायम राखेल असे वाटत होते. मात्र, पुजाराने ३१ चेंडूंचा सामना करत फक्त चार धावा केल्या. त्याला अँडरसनने बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या ऐवजी रवींद्र जडेजाला बढती मिळाली. तो देखील फार काही करू शकला नाही. हे सर्व खेळाडू बाद होत असतानाच कर्णधार कोहली मात्र टिकून खेळत होता. त्याने सुरुवातच अँडरसनला चौकार मारून केली आणि विश्वविक्रम केला. कोहलीने आपल्या खेळीत आठ चौकार लगावले. व्होक्सच्या चेंडूवर पहिल्या स्लिपमध्ये जो रुट याने कोहलीचा झेल सोडला होता. या जीवदानाचा त्याने फायदा घेतला. त्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर तो मोठी खेळी करू शकला नाही. त्याला रॉबिन्सनने बाद केले, तर अजिंक्य रहाणे देखील क्रेग ओव्हरटनचा बळी ठरला. चहापानासाठी सामना थांबविण्यात आला तेव्हा ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर दोघेही खेळपट्टीवर होते.
कोहलीने या सामन्यात संघात इशांत शर्मा आणि शमी ऐवजी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांना संधी दिली, तर इंग्लंडच्या संघात सॅम कुर्रनऐवजी ख्रिस व्होक्स आणि जोश बटलर ऐवजी ओली पोप यांना संधी मिळाली आहे.
धावफलक
पहिला डाव भारत ५१ षटकांत ६ बाद १२२ धावा
रोहित शर्मा झे. बेअरस्टो गो. ख्रिस व्होक्स ११, के. एल. राहुल पायचीत गो. रॉबिन्सन १७, चेतेश्वर पुजारा झे. बेअरस्टो गो. जेम्स अँडरसन ४, विराट कोहली झे. बेअरस्टो गो. रॉबिन्सन ५०, रवींद्र जडेजा झे. रुट गो. ख्रिस व्होक्स १०, अजिंक्य रहाणे झे. मोईन अली, गो. क्रेग ओव्हरटन १४, ऋषभ पंत खेळत आहे ४, शार्दुल ठाकूर खेळत आहे ४ अवांतर ८.
गडी बाद क्रम - १/२८, २/२८, ३/३९, ४/६९, ५/१०५, ६/११७
गोलंदाजी -
जेम्स अँडरसन १४-३-४१-१, ओली रॉबिन्सन १६-९-२४-२, ख्रिस व्होक्स १०-५-१९-२, क्रेग ओव्हरटन ११-२-३०-१