शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, शासनाने मागविली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:51+5:302021-09-02T04:37:51+5:30
जळगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. केरळ व महाराष्ट्रात अद्यापही ...

शिक्षकांनो, लसीकरण करून घ्या, शासनाने मागविली माहिती
जळगाव : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आता ओसरत असला तरी कोरोनाचा धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. केरळ व महाराष्ट्रात अद्यापही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे शासन आता प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शिक्षकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर शासनानेही लसीकरण झालेल्या शिक्षकांची माहिती मागविली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने प्रथम इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त गावांमध्ये या शाळा सुरू झाल्या. दरम्यान, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रुजू होताना, शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणीसह कोरोना लसीकरण बंधनकारक केले आहे. परंतु, अद्यापही शेकडो शिक्षकांनी कोरोना लसीकरण करून घेतले नाही. दुसरीकडे आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या शासन विचारत आहे. त्यामुळे शिक्षकांना लसीकरण करून घेण्याचे सांगितले.
टॅब दिले जाणार
दरम्यान, राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची बुधवारी व्हीसी झाली. त्यात जिल्ह्यातील लसीकरण झालेल्या शिक्षकांची माहिती पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ही माहिती अपलोड करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहे. येत्या काही दिवसात ही माहिती शासनाला पाठविण्यात येणार असल्यामुळे तालुकास्तरावरून संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
आठ हजारावर शिक्षकांचे लसीकरण
जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांमधील सहाशेच्यावर शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. या वर्गांमधील आठ हजारांच्यावर शिक्षकांनी आपले लसीकरण पूर्ण केले आहे. तर पन्नास हजारांच्यावर विद्यार्थी शाळांमध्ये हजेरी लावत आहे. परंतु, अजूनही कोरोनाच्या भीतीने पालक पाल्यांना शाळेत पाठवित नसल्याची स्थिती आहे.
अशा आहेत शाळा संख्या
जिल्हा परिषद शाळा : १८२८
शासकीय शाळा : ३१
मनपा शाळा : ३०
अनुदानित शाळा : ९६२
विनाअनुदानित शाळा : १५६