लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिक्षक आणि शास्त्रज्ञ हेच देशाचे निर्माते आहेत. या दोघांमध्येच राष्ट्रनिर्माण करण्याची शक्ती असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नॅनो संशोधक डॉ एल. ए. पाटील यांनी केले.
नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे आयोजित नोबेल विज्ञान पुरस्कार वितरण सोहळा रविवारी पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर, आबा महाजन, डॉ. संजय शेखावत, यजुर्वेंद्र महाजन, गौरव महाले, एन. टी. पाटील, माजी सैनिक विजय पाटील आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, एखादी व्यक्ती बुद्धिमान असण्यापेक्षा चारित्र्यवान असणे जास्त गरजेचे आहे. नवीन पिढीला चारित्र्यवान घडविण्यासाठी शिक्षक मोठी भूमिका बजावणार आहेत. शिक्षक आणि शास्त्रज्ञांनी कीर्तिवान होऊन समाजातून हरवलेल्या नैतिकतेला पुनरुज्जीवन द्यायला हवे.
यांचा झाला सन्मान
या वर्षाचे पुरस्कारांचे मानकरी शिक्षक गटात भानुदास जोगी, महेश बागड तर उर्मिला नाचण यांना डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर शाळा गटात कराड येथील सरस्वती विद्यालय, बारामती येथील शारदाबाई विद्यानिकेतन तसेच जळगाव येथील ब. गो. शानबाग विद्यालय यांना विज्ञान प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी गटात कौस्तुभ पवार तर संजीवनी मडवी यांना डॉ. एपीजे कलाम बालवैज्ञानिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आबा महाजन तसेच यजुर्वेंद्र महाजन यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार योगेश पाटील यांनी मानले.