सावखेडजवळ तापी पुलाचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 14:37 IST2020-01-04T14:36:30+5:302020-01-04T14:37:38+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौदावरील सावखेडा-निमगव्हाण गावाजवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

सावखेडजवळ तापी पुलाचे काम पूर्ण
नांदेड, ता.धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौदावरील सावखेडा-निमगव्हाण गावाजवळील तापी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या पुलावरून एसटी बसेस वगळता इतर रहदारी सुरू आहे. या मार्गावरील बस सेवाही सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. पुलाच्या मुख्य कामाच्या दुरुस्तीसाठी पूल महिनाभर रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सद्य:स्थितीत पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले असून, पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
१ जानेवारीपासून पुलावरून एसटी बसेस वगळता खासगी वाहनांची रहदारी सुरू आहे. बससेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. बसेसअभावी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांंनी एसटी महामंडळाला पुलावरून बसेस सुरू करण्याबाबतचे पत्र देवून प्रवाशांचे बसेसविना होत असलेले हाल थांबवावेत, अशी आग्रही मागणी परिसरातील जनतेतून केली जात आहे