राष्ट्रीय क्रिकेटपटूंना खेळाडूंना घडवणारे तन्वीर अहमद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:24+5:302021-06-21T04:13:24+5:30
जळगाव : गेल्या दोन ते तीन सत्रांमध्ये जगदीश झोपे, शशांक अत्तरदे यांनी रणजी स्पर्धेत चांगला खेळ केला. जगदीश महाराष्ट्राकडून ...

राष्ट्रीय क्रिकेटपटूंना खेळाडूंना घडवणारे तन्वीर अहमद
जळगाव : गेल्या दोन ते तीन सत्रांमध्ये जगदीश झोपे, शशांक अत्तरदे यांनी रणजी स्पर्धेत चांगला खेळ केला. जगदीश महाराष्ट्राकडून तर शशांक हा मुंबईच्या रणजी संघाकडून खेळला. त्यासोबतच जळगावच्या पुरुष आणि महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवणाऱ्या प्रशिक्षकांमध्ये तन्वीर अहमद जहागीरदार यांचे नाव आहे.
तन्वीर हे २०१० पासून जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकादमीत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसुयश बुरकुल हे देखील जिल्हा क्रिकेट संघटनेच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. त्यांच्यासोबत मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये तन्वीर अहमद जहागीरदार यांचाही समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत जगदीश झोपे, शशांक अत्तरदे यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यासोबतच विजय हजारे चषकात खेळलेल्या धवल हेमनाणी, १७ वर्षा आतील गटात राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या रिषभ कालरा, मुलींच्या २३ वर्षा आतील गटात खेळलेली सुषमा पाटील, साक्षी पाटील, सी.के. नायडू चषकात खेळलेली यशश्री देशमुख हे सर्व जण तन्वीर यांचेच खेळाडू आहेत.
तन्वीर यांनी खेळाडू असतानाही चांगली कामगिरी केली होती. त्यांनी काही वर्षे सातत्याने जिल्हा क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर जिल्हा संघाकडून खेळत असतानाच २००८ च्या सुमारास नव्याने येणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. २०१० पासून त्यांनी खेळणे बंद केले आणि संपूर्ण लक्ष फक्त क्रिकेटकडेच दिले. नव्याने येणाऱ्या खेळाडूंना तंत्रशुद्ध फलंदाजी शिकवण्यात त्यांचा हातखंडा आहे. जळगाव संघाकडून खेळलेले रणजीपटू हे त्यांच्या प्रशिक्षण कौशल्याचे उदाहरण आहे. जगदीश हा मूळ गोलंदाज आहे. मात्र त्यासोबतच आपले अष्टपैलुत्व सिद्ध करत त्याने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजीदेखील केली आहे.
त्यासोबतच वेस्ट झोन चॅम्पियनशिपमध्ये खेळलेला नचिकेत ठाकूर, नीरज जोशी, महाराष्ट्र संघाकडून खेळलेला फलंदाज तनिष जैन, जलदगती गोलंदाज रोहित पटेल हे त्यांचेच विद्यार्थी आहेत. गेल्या अकरा वर्षांपासून ते जैन स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षण देत आहेत.
मैदानापासून दूर, तरीही प्रशिक्षण सुरूच
कोरोनाच्या काळात सर्वच खेळाडू आणि प्रशिक्षकांना मैदानापासून दूर रहावे लागले. मात्र जैन स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष अतुल जैन आणि समन्वयक अरविंद देशपांडे यांनी ऑनलाइन प्रशिक्षणाची कल्पना पुढे आणली. त्यातही तन्वीर हे नव्या खेळाडूंना बॅटची ग्रीप कशी पकडावी, तसेच स्टान्स कसा असावा, याचे प्रशिक्षण देऊ लागले. तसेच इतर टिप्सही खेळाडूंना देत.