तालिबानी ‘भडक्या’मुळे मसाल्यांचा वाढला ‘तडका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:24+5:302021-08-20T04:21:24+5:30
लवंग, शहाजीऱ्याचे भाव वाढले : इतर दर मात्र स्थिर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अफगाणिस्थानमध्ये तालिबान्यांनी आपली राजवट सुरू ...

तालिबानी ‘भडक्या’मुळे मसाल्यांचा वाढला ‘तडका’
लवंग, शहाजीऱ्याचे भाव वाढले : इतर दर मात्र स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अफगाणिस्थानमध्ये तालिबान्यांनी आपली राजवट सुरू केल्यामुळे देशात अराजकता माजली असून, यामुळे देशातील निर्यात व आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. तालिबान्यांचा या भडक्यामुळे भारतात येणाऱ्या मसल्याचा तडका वाढला असून, मसालेदार भाज्यांमध्ये वापर होणाऱ्या शहाजीऱ्याच्या दरामध्ये किलोमागे ५० ते ७० रुपयांची वाढ झाली आहे. यासह आवक कमी झाल्याने लवंगीचे दरदेखील काही प्रमाणात वाढले आहेत.
दरम्यान, अफगाणिस्थानमधील आयात कमी होत असल्याने भविष्यात मसाल्याचा भावात वाढ होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. भारतात शहाजीऱ्याची आवक ही मुख्यत्वेकरून अफगाणिस्थानमधूनच होत असते. मात्र, बदललेल्या राजवटीमुळे या आवकमध्ये प्रचंड घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर मसाल्यांचे दर जरी स्थिर असले तरी येत्या काळात आवक कमी होऊन हे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.
...असे वाढले दर
शहाजिरा - ६०० आताचे - आधीचे ५२०
लवंग - ९०० - ८४०
रामपत्री - १००० - १४०० आताचे - ९०० ते १४००
काळीमिरी - ५०० ते ११०० आताचे - ४०० ते ११००
बाजाफूल - १३०० ते १८०० - १३०० ते १७५० आधीचे
महागाई पाठ सोडेना
गेल्या वर्षभरात प्रत्येक वस्तू व पदार्थाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे आता मसाले असो वा इतर खाद्यतेल घेणेदेखील सर्वसामान्यांना परवडत नाही. आधीच तेलाचे दर वाढल्याने जेवणात तेल कमी करावे लागले. आता मसालेही कमी करावे लागत आहेत.
-श्वेता पाटील, गृहिणी
सर्वसामान्यांना आता बाजारातील पदार्थ परवडत नाही. मसाल्याचे दरदेखील वाढत आहेत. मसाला हा दैनंदिन जीवनाचा एक घटक आहे. मात्र, या भावामुळे आता मसाल्याचे पदार्थ खाणेच बंद करण्याची वेळ येणार आहे.
-अश्विनी जाधव, गृहिणी
...म्हणून वाढले दर
अफगाणिस्थानमधून शहाजिऱ्याची आवक होत असते. मात्र, त्याठिकाणची राजकीय परिस्थिती बिघडल्याने त्याठिकाणाहून येणाऱ्या शहाजिऱ्याचा आवकवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहाजिऱ्याचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, इतर मसाल्यांचे दर स्थिर आहेत.
-सुरेश बरडिया, व्यापारी
लवंगीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, इतर मसाल्यांचे दर स्थिर आहेत. कोणत्याही मसाल्यांचे दर फारसे वाढलेले नाहीत. मालाच्या दर्जानुसार काही मसाल्यांचे भाव कमी-जास्त असू शकतात. मात्र, फारशी वाढ झालेली नाही.
-सचिन अहुजा, व्यापारी