५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यास अटक
By Admin | Updated: May 21, 2014 01:14 IST2014-05-21T01:14:05+5:302014-05-21T01:14:05+5:30
बोअरवेलची नोंद : टाकरखेडा येथील घटना

५०० रुपयांची लाच घेताना तलाठ्यास अटक
दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे बोअरवेलची नोंद सातबारा उतार्यावर घेण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना तेथील तलाठ्यास लाचलुचपत विभागाचे रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांनी आपल्या गट क्रमांक १७१/२ अ या एक हेक्टर शेतात बोअरवेल केली आहे. त्याबाबत सातबारा उतारा घेण्यासाठी टाकरखेडा येथील तलाठी सुभाष कौतीक गवळी यांच्याकडे आले. वेळोवेळी मागणी करूनही तलाठी या कामाबद्दल ५०० रुपयांची मागणी करीत राहिले. अखेर तलाठी गवळी यांना ५०० रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार २० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता टाकरखेडा येथील तलाठी कार्यालयात पैसे देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार टाकरखेडा येथील तलाठी कार्यालयात आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तक्रारदार पैसे घेऊन पोहचले. त्यांनी तलाठी गवळी यांच्याकडे या कामाबद्दल ५०० रुपये दिले. त्याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना पकडले. विभागाच्या सापळ्यात तलाठी गवळी रंगेहाथ सापडले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागाचे अधिकारी शशिकांत माहूरकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गवळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.