लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:25+5:302021-06-26T04:12:25+5:30
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना : शासकीय भरडधान्य खरेदीस सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काही कृषी केंद्रचालक लिंकिंगच्या ...

लिंकिंग करणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कठोर कारवाई करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना : शासकीय भरडधान्य खरेदीस सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही कृषी केंद्रचालक लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, अशा चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. शासकीय भरडधान्य खरेदीस चिंचोली व म्हसावद येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी तालुक्यातील चिंचोली येथे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सह.संस्थेमार्फत तर म्हसावद येथे शेतकी संघामार्फत शासकीय किमान आधारभूत रब्बी भरडधान्य खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते काटा पूजन करून धान्य खरेदी सुरू करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन शैलजा दिलीप निकम होत्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, तहसीलदार नामदेव पाटील, अजबराव पाटील, नियोजन समितीचे सदस्य वाल्मीक पाटील, व्हाईस चेअरमन संजीव पाटील, रवी कापडणे , संचालक रमेश पाटील, अर्जुन पाटील, अनिल भोळे, ऋतेश निकम, सरपंच गोविंद पवार, समाधान चिंचोरे, विजय आमले, व्यवस्थापक व्ही.पी. पाटील, दीपक पाटील उपस्थित होते. गुलाबराव पाटील म्हणाले की, किमान आधारभूत किंमत योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात एकूण १७ खरेदी केंद्रे असून ज्वारीसाठी २५ हजार ५०० क्विंटल, मक्यासाठी ६० हजार क्विंटल तर गव्हासाठी २ हजार २४० क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट कमी पडत असल्याने वाढीव उद्दिष्टासाठी व मुदतवाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केंद्रांच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
मुदतवाढ देण्याची मागणी
दरम्यान, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून बळीराजाच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. संस्थेचे संचालक रमेश पाटील यांनी भरडधान्य खरेदीबाबत उद्दिष्टवाढीची व मुदत वाढीची मागणी केली. आभार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मीक पाटील यांनी मानले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २० लाख रुपयांची एक अद्ययावत रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची घोषणा केली.