महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ
By Admin | Updated: October 9, 2014 15:07 IST2014-10-09T15:07:20+5:302014-10-09T15:07:20+5:30
महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नंबर एकवर नेऊ
>चाळीसगाव: १५ वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात पिछेहाट केली. आता महाराष्ट्र पुन्हा नंबर वन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देत भाजपाला महाराष्ट्रात सत्ता द्या. निश्चितच सर्व प्रश्न सुटतील, अशी ग्वाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चाळीसगाव येथे विविध सभांमधून दिली.
चाळीसगाव येथे वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त आज देवकर मळ्यात कोळी समाजाचा विभागीय मेळावा झाला. प्रतिमा पूजन व दीपप्रज्वालन अमित शहा यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आदिवासी कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रमेश पाटील (कोळी) होते. सुरुवातीस शहा यांना कोळी समाजाची खास ओळख असलेली टोपी देऊन सामजाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. याचवेळी समाजाचे नेते रमेश पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला.
काँग्रेस सरकारवर टीका करताना शहा म्हणाले की, कृषी तसेच औद्योगिक शिक्षण, सहकारी संस्थेत महाराष्ट्र पुढे होता, परंतु हा विकास दर गत १५ वर्षांत कमी झाला. देशाचे कृषिमंत्री शरद पवार असताना येथे दररोज शेतकर्यांच्या आत्महत्या होत होत्या. आघाडी सरकारने १0१ विविध घोटाळ्यांत ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला.
सभेत विठ्ठलराव म्हस्के, सुमनबाई कोळी, मुकेश सोनवणे, सिंधूबाई शिंदे, शिवशंकर फुले, प्रभाकर सोनवणे, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर खासदार ए.टी. पाटील, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, उन्मेष पाटील, के.बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, वाडीलाल राठोड, कोळी समाज जिल्हाध्यक्ष अण्णा कोळी, अविनाश चौधरी, श्याम जाजू, आनंद खरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.