मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:20+5:302021-08-23T04:20:20+5:30
जळगाव - शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून, यामुळे रात्रीच्यावेळेस बाहेर जाण्यासही नागरिकांची हिंमत होत ...

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
जळगाव - शहरातील सिंधी कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून, यामुळे रात्रीच्यावेळेस बाहेर जाण्यासही नागरिकांची हिंमत होत नाही. मनपाकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत केवळ आश्वासने दिली जात असून, त्यावर अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. याबाबत प्रशासनाने गांभिर्याने काम करून ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी सिंधी कॉलनीतील रहिवासी वासुदेव कुकरेजा यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला आहे.
मनपाकडून आजपासून गाळेभाडे वसुली मोहीम
जळगाव - महापालिका प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाड्याची वसुली मोहीम पुन्हा सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे. राज्य शासनाने गाळेधारकांवर मनपाने लावलेला पाच पट दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मनपा प्रशासनाने थकीत भाड्यापोटी गाळेधारकांकडे थकीत रक्कमेतून पाच पट दंडाची रक्कम वजा केली असून, आता नव्याने बीलं घेवून ती बील मनपाकडून गाळेधारकांना देण्यात येणार आहेत.
शिवाजीनगर भागात कचऱ्याची समस्या
जळगाव - शहरातील नागरिक एकीकडे रस्त्यांचा समस्येने त्रस्त असताना दुसरीकडे आता खराब रस्त्यांमुळे शहरातील अनेक भागात मनपाच्या घंटागाड्या जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे. रस्त्यावर चिखलासोबत आता कचरा देखील पसरला असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आठवडाभर पाऊस उसंत घेणार
जळगाव - गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यासह शहर परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले आहेत. मात्र, येत्या आठवडाभर पाऊस पुन्हा काही दिवस उसंत घेण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.येत्या आठवडाभर जिल्ह्यातील काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. मात्र, हा पाऊस नियमित राहणार नाही. मात्र, ३१ ऑगस्टनंतर पुन्हा जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.