जळगाव : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत ज्येष्ठ पत्रकारांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व न्याय हक्काच्या विविध मागणीसाठी जळगाव जिल्हा अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुधवारी सकाळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या उपोषणात ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी, अरुण मोरे, केदारनाथ दायमा, एस. पी. कुळकर्णी, सुभाष पाटील, अशोक जैन, अनिल मुजूमदार, परशुराम नाईक, जमनादास भाटिया, विजय पाटील, अहमद हक गुलाब अहमद देशमुख आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला होता. सायंकाळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नवीन जीआर काढून अंमलबजावणी करावी....
शासनाने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना आर्थिक मदत देण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू केली आहे. त्यासाठी अटी-शर्ती असलेला व ज्येष्ठ पत्रकारांबाबत नियम ठरविलेला जी.आर. २ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाने काढला आहे. या नियमांच्या आड पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानाने मदत करण्याऐवजी त्यांची प्रकरणे नामंजूर केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकारांवर हा अन्याय असून, जीआरमध्ये तातडीने दुरुस्ती करावी व ज्येष्ठ पत्रकारांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच योजनेतील ६० वर्षांवरील ज्येष्ठ पत्रकारांकडून नियुक्तिपत्र, वेतन स्लीप, जुने अंक वगैरेची अन्याय मागणीचे नियम रद्द करावे, ज्येष्ठ पत्रकारांसाठी अनुभव २५ वर्षे व वय ५८ ठेवावेत अडवणूक टाळून पत्रकारांना माहिती द्यावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.