परप्रांतीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 22, 2016 13:19 IST2016-10-22T13:19:48+5:302016-10-22T13:19:48+5:30
भुसावळ शहरातील एचडीएफसी बँकेमागील रेल्वे रूळाजवळ परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळला असून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

परप्रांतीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
>गणेश वाघ, ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. २२ - शहरातील एचडीएफसी बँकेमागील रेल्वे रूळाजवळ परप्रांतीय महिलेचा मृतदेह आढळला असून या महिलेचा खून करून मृतदेह फेकल्याचा संशय वर्तवला जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आठ वाजेपूर्वी जळगाव रस्त्यावरील एचडीएफसी बँकेमागे ३५ ते ४० वर्षीय महिलेचा मृतदेह असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर निरीक्षक डी़बी़सरक, लोहमार्ग गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक उज्वल पाटील यांच्यासह सहका-यांनी धाव घेतली़ रेल्वे रूळाला लागून असलेल्या नाल्यातच मृत महिला आढळली़. महिलेच्या डोक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. महिलेचा खून करून मृतदेह तेथे टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
या संदर्भात लोहमार्गचे निरीक्षक सरक म्हणाले की, खुनाची शक्यता वाटत नाही मात्र आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतरच अधिक काही सांगता येईल. महिलेच्या हातावर लिहिलेल्या नावावरून ती परप्रांतीय असावी़ असा अंदाज व्यक्त होत आहे.