निलंबित पोलिसाला एक वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: November 19, 2014 13:53 IST2014-11-19T13:34:59+5:302014-11-19T13:53:00+5:30
पोलीस अधिकार्यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी पोलीस कर्मचा-याला एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निलंबित पोलिसाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव : खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी घरझडती घेतल्याच्या रागातून पोलीस अधिकार्यांना त्रास देण्यासाठी १२ आमदारांना बदनामीकारक नोटीस पाठविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्या.संजय कुलकर्णी यांनी निलंबित पोलीस कर्मचारी सोपान भिका पाटील (वय-४0, रा.जळगाव) याला एक वर्ष कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
निलंबित पोलीस कर्मचारी सोपान भिका पाटील व हंसराज पद्मसिंग हजारी (दोघे रा.जळगाव) यांच्यावर काही वर्षांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक राजू तळेकर व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हरि मोरे यांच्याकडे होता.
दोघा अधिकार्यांनी घरझडती घेतल्याचा राग आल्याने दोघा आरोपींनी त्यांना त्रास व्हावा यासाठी अँड.सतीश तायडे या उच्च न्यायालयात अस्तित्वात नसलेल्या वकिलांच्या नावाने बनावट नोटीस तयार केली होती. ही नोटीस दोघांनी १२ आमदारांना पाठवून त्यात बदनामीकारक मजकूर टाकला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक राजू तळेकर यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचे कामकाज न्या.संजय कुलकर्णी यांच्या कोर्टात चालले.
सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी ११ साक्षीदार तपासले. सोपान पाटील याच्यावर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने कलम ४६५ नुसार एक वर्ष शिक्षा व दोन हजारांचा दंड, कलम ४७१ प्रमाणे एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंड तसेच कलम ५00 प्रमाणे सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील दुसरा आरोपी हंसराज हजारी याला सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले आहे.
सरकारतर्फे अँड.अनिल बागले यांनी तर आरोपीतर्फे अँड.य™ोश पाटील यांनी काम पाहिले.