‘मद्रास कॅफे’चा परवाना निलंबित
By Admin | Updated: May 14, 2014 00:59 IST2014-05-14T00:59:20+5:302014-05-14T00:59:20+5:30
हॉटेल मद्रास कॅफेमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या पत्रकाराच्या मसाला डोसाच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली.

‘मद्रास कॅफे’चा परवाना निलंबित
जळगाव : स्टेडियम कॉम्प्लेक्समधील हॉटेल मद्रास कॅफेमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या पत्रकाराच्या मसाला डोसाच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने संबंधीत हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व नियम नियमन २०११ अंतर्गत परवाना हॉटेलमध्ये दर्शनीभागात लावणे बंधनकारक आहे. मात्र हॉटेलमध्ये हा परवानाच आढळून आला नव्हता. मालक तुषार पेठकर हे बाहेरगावी असल्याने त्यांनाच याबाबत माहिती असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. तसेच शॉप अॅक्ट नुसार नोंदणी प्रमाणपत्र देखील लावलेले नव्हते. त्याची देखील झेरॉक्स प्रतच सादर करण्यात आली. त्यामुळे हॉटेल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक संचालक बी.यू. पाटील यांनी दिले आहेत. दरम्यान पेठकर यांनी हा परवाना सादर केला. त्यावर मंगळवारी हा परवाना निलंबित करण्याचे आदेश सहायक संचालकांनी दिले. हॉटेलमध्ये अस्वच्छता व अनेक त्रुटी आढळल्याने त्यांची पूर्तता केल्यावरच परवान्याचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे.