सूर्यवंशी, पवार यांच्यासह चौघांनी केल्या साडेतीन कोटींच्या नोटा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:44+5:302021-03-04T04:28:44+5:30
जळगाव : जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत जिल्हा परिषदेचे अधिकारी सुनील अभिमन्यू सूर्यवंशी, नंदकुमार सीताराम पवार, शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर ...

सूर्यवंशी, पवार यांच्यासह चौघांनी केल्या साडेतीन कोटींच्या नोटा बदल
जळगाव : जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत जिल्हा परिषदेचे अधिकारी सुनील अभिमन्यू सूर्यवंशी, नंदकुमार सीताराम पवार, शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर बाबुराव पाटील व कॅशिअर रवीशंकर आर गुजराथी यांनी रिझर्व बँकेचे निर्देश डावलून ३ कोटी ६३ लाख २० हजार ८७३ रुपयांच्या नोटा बदल केल्याचा ठपका सीबीआयने चौघांवर ठेवला आहे. या प्रकरणी अमळनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. येत्या २४ मार्च रोजी त्यावर आता सुनावणी होणार आहे.
नोटाबंदीच्या काळात हजार व पाचशेच्या नोटा बदलून देण्याचा गैरव्यवहार जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत झाला होता. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणाच्या नोटा बदल करू नये, असे स्पष्ट निर्देश सहकारी बँकांना दिले होते. त्यात शेतकऱ्यांसाठीही मर्यादा ठरवून देण्यात आली होती. या चौघांनी बनावट खाते तयार करून एक हजाराच्या नावाखाली दहा हजारांच्या नोटा बदल करून, मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे झाली होती. त्याची दखल घेऊन सीबीआयच्या मुंबई एसीबी पथकाने जिल्हा बँक, चोपडा शाखा यांच्यासह वरील चौघांकडे धाडसत्र राबविले होते. यात चौकशीअंती चौघांनी ३ कोटी ६३ लाख २० हजार ८७३ रुपयांच्या नोटा बदल केल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी सीबीआयने अमळनेर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. २६ जुलै, २०१९ रोजी न्यायालयाने चौघांवर विविध कलमान्वये दोष ठेवला. मात्र, त्यांनी तो नाकारला आहे. आता त्यावर २४ मार्च रोजी औपचारिक युक्तिवाद होणार आहे.
या कलमान्वये ठेवला ठपका
१२० ब- सामूहिक कट रचणे
४०९- सरकारी नोकर, बँक अधिकारी, एजंट यांनी फौजदारी विश्वासघात करणे
४६५- कागदपत्रांमध्ये फेरफार
४७७ अ- खोटे कागदपत्रे व सह्या करून खोटे बँक अकाउंट तयार करणे
एसीबी- भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम बी (२) बी (१) (सी) १३ (१) (ड)
दृष्टिक्षेपात प्रकरण
- ३ मार्च, २०१७ रोजी सीबीआयचा गुन्हा दाखल
- सुनील सूर्यवंशी, नंदकुमार पवार, ज्ञानेश्वर पाटील व रवीशंकर गुजराथी यांच्यावर गुन्हा दाखल
- ३ कोटी ६३ लाख २० हजार ८७३ रुपयांच्या नोटा बदलचा ठपका
- १५ फेब्रुवारी, २०१८ रोजी दोषारोपपत्र दाखल
- २६ जुलै, २०१९ रोजी रोजी न्यायालयाने आरोपींविरुद्ध दोषारोप ठेवले
- २४ मार्च, २०२१ अमळनेर न्यायालयात पुढील सुनावणी