पारोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 19:24 IST2018-08-18T19:23:13+5:302018-08-18T19:24:00+5:30
पोलीस निरीक्षकांनी घेतला बैठकीत आढावा

पारोळ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सर्व्हे
पारोळा, जि.जळगाव : शहरात मागील सहा महिन्यात अनेक घरफोड्या व भुरट्या चोऱ्या वाढल्याने याबाबत पोलीस निरीक्षक विलास सोनवणे यांनी सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांची बैठक घेऊन याबाबत शहरातील सर्व कॉलनीतील नागरिकांची बैठक घेणार असल्याचे संकेत दिले. दरम्यान, पारोळा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत पालिकेने काही जागांचा सर्व्हे केला आहे.
या वेळी नगरसेवक नितीन सोनार, दीपक अनुष्ठान, संजय पाटील, महेश चौधरी, राजेंद्र पाटील, प्रकाश महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी रवींद्र रावते, सुनील पवार, बापू पाटील आदी उपस्थित होते.
बाहेरगावी जाताना शेजारी सांगा
या वेळी पो.नि. विलास सोनवणे यांनी व्यथा मांडताना सद्य:स्थितीत पारोळा पोलीस स्टेशनला ब्रिटिशकालीनच संख्याबळ आहे. तालुका व शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता सदर मनुष्य बळ अपूर्ण पडत आहे. आज शहराच्या चारही बाजूला नवीन वसाहतींचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या गस्त घालण्याबाबत अडचणीदेखील वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून किमान आपल्या सुरक्षेबाबत काळजी घेण्याची गरज वाढली आहे. बाहेरगावी जाताना नातेवाईक, मित्र यांना झोपण्यास सांगणे, घरात मौल्यवान वस्तू , रोख रक्कम ठेवू नये अशा सूचना दिल्या.
शहरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
या वेळी दीपक अनुष्ठान, नितीन सोनार यांनी शहराच्या अनेक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत पालिका प्रशासनाची मदत घेण्याच्या सूचना मांडल्या. याबाबत आपले नगराध्यक्ष करण पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. याबाबत शहरातील ७५-८० जागांचे सर्व्हे करण्यात आले आहेत. त्याचे अंदाजपत्रक लवकरच येणार आहे. याबाबत आपण स्वत: लक्ष घालून असल्याचे पो.नि विलास सोनवणे यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी, सराफ, मोबाइल दुकाने यांनी, सामूहिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले.
कॉलनी भागात घेणार बैठका
या वेळी सोनवणे यांनी सांगितले की, आपण रोज दोन, तीन कॉलनी भागात नागरिकांच्या बैठका घेणार आहोत. नागरिकांनी पुढे आल्यास व सामूहिक निधी गोळा करून मासिक पगार दिल्यास आपण कॉलनीप्रमाणे होमगार्ड यांना मदतीसाठी देऊ, असे सांगितले.