जळगाव : घरकुल प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव तीन महिन्यांसाठी बुधवारी तात्पुरती जामिनावर सुटका केली.घरकूल प्रकरणात धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेशदादा जैन यांच्यासह ४७ जणांना दोषी ठरवून सात वर्ष कारावास व १०० कोटी रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या सर्व आरोपींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, जैन यांनी तब्येत ठीक नसल्याने उपचार घेण्यासाठी जामिनावर सुटका करावी, याकरिता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला. त्याची बुधवारी सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली. न्यायालयाने जैन यांना उपचार करण्याकरीता तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन पाच लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर मंजूर केला. ७६ वर्षांचे सुरेशदादा जैन यांची प्रकृती ठीक नाही. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि ते मुंबईत उपचार घेत आहेत. खटल्यादरम्यान जैन यांनी चार वर्षे कारावास भोगला आहे, असा युक्तिवाद सुरेशदादा जैन यांचे वकील आबाद पौडा यांनी न्यायालयात केला. दरम्यान,पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होईल.सध्या सुरेशदादा जैन हे फर्लोवर आहेत. पुढील उपचार ते मुंबईतील रुग्णालयातच घेणार आहेत. जैन यांच्यासह सत्र न्यायालयाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी नगरसेवक व काही अधिकाऱ्यांना घरकूल प्रकरणात दोषी ठरविले.३१ आॅगस्ट रोजी अटकधुळे न्यायालयाने ३१ आॅगस्ट रोजी दोषी ठरवून सर्व ४७ आरोपींना शिक्षा सुनावली होती. तेव्हा लगेच सुरेशदादा जैन यांच्यासह सर्वांना अटक झाली होती. दुसºया दिवशी त्यांची नाशिक कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान, मध्यंतरी प्रकृती खालावल्याने सुरेशदादा जैन यांना मुंबईला रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात सुरेशदादा जैन यांनी आपले जामीन व अपीलाचे कामकाज औरंगाबाद खंडपीठाऐवजी मुंबई उच्च न्यायालयात व्हावे म्हणून स्थलांतरासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज मंजूर करुन प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात स्थलांतर झाले.
उपचारासाठी सुरेशदादा जैन यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:43 IST