अतिरिक्त कामाच्या तणावातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:59+5:302021-06-22T04:11:59+5:30

जळगाव : गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त कामाचा ताण व त्यात नोकरी जाण्याची भीती यामुळे तणावात आलेल्या प्रदीप धनलाल शिंपी ...

Suicide of a finance company manager due to extra work stress | अतिरिक्त कामाच्या तणावातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

अतिरिक्त कामाच्या तणावातून फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

जळगाव : गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त कामाचा ताण व त्यात नोकरी जाण्याची भीती यामुळे तणावात आलेल्या प्रदीप धनलाल शिंपी उर्फ कापुरे (४५,रा.मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. शिंपी हे मुथूट होमफिन इंडिया लिमिटेड या फायनान्स कंपनीत क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कंपनीच्या लेटरहेडवर तीन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, कुटुंबाने फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आरोप केले असून त्यांच्यामुळेच शिंपी यांनी आत्महत्या केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

प्रदीप शिंपी हे पत्नी सुचिता, मुलगा कुणाल,मुलगी यज्ञा, आई सुमनाबाई, भाऊ सुनील यांच्यासह मयूर कॉलनीत वास्तव्याला होते. रात्री कुटुंबाने जेवण केल्यानंतर साडे बारा वाजता सर्व जण झोपले. पत्नी सुचिता या सकाळी सहा वाजता उठल्या असता त्यांना मागच्या खोलीत पतीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. पलंगावर तीन पानांची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. दरम्यान, कुटुंबाने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. तर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे सुशील चौधरी, बारेला यांनी पंचनामा केला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप शिंपी हे १ नोव्हेंबर २०१७ पासून कंपनीत क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गेल्या दीड वर्षापासून अतिरिक्त काम सोपविण्यात आले असून ते अत्यंत किचकट आहे. त्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सहा महिन्यापासून ते हताश होते. वारंवार नोकरी जाण्याची भीती मनात येत होती, किंबहुना वरिष्ठांकडून त्यांना तशी धमकी दिली जात होती. २० मे पासून औरंगाबाद येथील जबाबदारीही सोपविण्यात आली होती. कमी मनुष्यबळात जास्त काम करावे लागत असल्याने आजारपणही आले. त्यातून सावरल्यानंतर पुन्हा कामाचा ताण व वरिष्ठांचा दबाव वाढला त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. हीच कारणे त्यांनी चिठ्ठीत पण लिहिलेली आहेत.

भिरुडखेडा येथील व्यक्तीने खोट्या कागदपत्रावर कर्ज घेतल्याचा आरोप

१) जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळील भिरुडखेडा येथील गोसावी नावाच्या एका व्यक्तीने खोट्या कागदपत्राच्या आधारे २५ लाखाच्यावर कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी प्रदीप शिंपी त्यांच्याकडे जायचे तेव्हा ती व्यक्ती तलवार काढून मारण्याची धमकी द्यायचा, अनेक वेळा तेथे मारहाणही झालेली आहे. गावातील लोक त्याच्या मागे काठ्या घेऊन सुटायचे. तर दुसरीकडे तुला त्या व्यक्तीकडून कर्जाची वसुली करावीच लागेल असे वरिष्ठ दबाव टाकायचे. यातून दिलासा मिळावा म्हणून आपण स्वत: ५० हजार रुपये भावाला दिल्याची माहिती प्रदीप यांची बहीण रेखा कमलाकर शिंपी यांनी ‘लोकमत’ ला दिली.

२) दरम्यान, कार्यालयातील वरिष्ठांनी भावाकडून कर्जाच्या वसुलीबाबत जबरदस्तीने लिहून घेतले आहे. त्याने कर्ज भरले नाही तर तुला भरावे लागेल असा दम दिला होता. अशी वेळ आली तर मला आत्महत्या करावी लागेल असे भावाने मला व वरिष्ठांनाही सांगितले होते. गोसावी यांनी खोटे कागदपत्र सादर केल्याचा प्रकार नंतर उघडकीस आला. माझ्या भावाला न्याय मिळावा, त्याच्या सारखे अनेक भाऊ तेथे काम करताहेत. त्याच्या घटनेला कार्यालयातील वरिष्ठ जबाबदार असून पुण्याचे प्रशांत बर्वे नावाचे अधिकारी सातत्याने दबाव टाकत होते. या सर्व लोकांविरुध्द गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही रेखा शिंपी यांनी केली. मुलगा नववीत शिक्षण घेत आहे तर मुलगी सहा वर्षाची आहे. संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.

वरिष्ठांनी कुटुंबाला सहकार्य करावे

माझ्या आत्महत्येनंतर पत्नी व मुलं रस्त्यावर येणार नाहीत यासाठी कंपनीच्या वरिष्ठांनी सहकार्य करावे. कंपनी नियमानुसार मला विमा, पीएफ व इतर जे देय आहे ते माझ्या पत्नीला देण्यात यावे. कंपनीचे मालक खूप चांगले आहेत, ते ही जबाबदारी घेतील. ठोस व ठराविक रक्कम परिवाराला देतील, अशी अपेक्षाही त्यांनी चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.

कोट....

पतीवर कार्यालयीन तणाव होता. वरिष्ठ त्यांच्यावर दबाव आणायचे. दोन महिन्यांपासून त्रास होता. काम होत नसेल तर नोकरी सोडून दे असे वरिष्ठ सांगायचे. पुण्याचे प्रशांत बर्गे यांचाच जास्त त्रास होता. औरंगाबादचे जास्तीचे काम सोपविले होते. पतीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हावी व उघड्यावर आलेल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.

-सुचिता शिंपी, पत्नी

कोट...

कुटुंबाने केलेले आरोप वेदनादायी आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप केले असले तरी मी कुठलेही आरोप करणार नाही. व्यक्ती म्हणून त्यांच्या कुटुंबाला जे काही सहकार्य करता येईल ते केले जाईल. वाकोद येथे १२ प्रकरणे चुकीच्या कागदपत्राच्या आधारे झाली आहेत. तेथे त्यांना कधीच वसुलीसाठी पाठविले नाही. पुण्याहून मी व वकील असे तीन वेळा तेथे गेलो. औरंगाबाद येथे नवीन अधिकारी येईपर्यंत दोन महिने काम बघायला सांगितले होते. त्यालाही त्यांनी नकार दिला होता. मानसिक स्थिती व आजारपणामुळे मी त्यांची सुटी मंजूर केली.

-प्रशांत बर्गे, वरिष्ठ अधिकारी मुथूट होमफिन इंडिया लि.पुणे

Web Title: Suicide of a finance company manager due to extra work stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.