नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:32 IST2019-11-24T22:32:36+5:302019-11-24T22:32:45+5:30
तोंडापूर, ता.जामनेर : नापिकीला कंटाळून येथील भाऊराव आनंदा अपार या ६७ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन अत्महत्या केली. ही ...

नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
तोंडापूर, ता.जामनेर : नापिकीला कंटाळून येथील भाऊराव आनंदा अपार या ६७ वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन अत्महत्या केली. ही घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली.
येथील भाऊराव आनंदा अपार यांनी त्यांच्याकडे असलेल्या चार ते पाच एकर शेतीत मेहनत करुनही पीक हाती न लागल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून अत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांना एक अपंग मुलगी असून मुलाचे लग्न बाकी असताना शेतातही नुकसान झाल्याने विहिरीच्या काठावर आपला रुमाल, घड्याळ, वीस रुपयांची नोट आणि पायातील बूट काढून ठेवत त्यांनी विहिरीत उडी घेतली. सकाळी कापूस वेचणीसाठी पाणी काढायला गेलेल्या महिलांच्या हा प्रकार लक्षात आला. पहूर पोलिसांतर्फे पंचनामा करण्यात आला.
यावेळी पोलीस हवलदार किरण शिंपी, नवल हटकर, पोलीस पाटील सुलोचना पाटील, जितेंद्र पाटील, माजी सरपंच सुनील कालभिले, नाना जाधव, जगन काळे व ग्रामस्थ उपस्थित होते. मृतास शवविच्छेदनासाठी जामनेर येथे हलविण्यात आले.