ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:26+5:302021-07-15T04:13:26+5:30
जळगाव : आठ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी झालेली. त्यात फुप्फुसाची कार्यक्षमता कमी, अशातच उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृद्धावर म्युकरमायकोसिसची शासकीय ...

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया
जळगाव : आठ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी झालेली. त्यात फुप्फुसाची कार्यक्षमता कमी, अशातच उच्च रक्तदाब असलेल्या एका वयोवृद्धावर म्युकरमायकोसिसची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिगंभीर अवस्थेत असलेल्या या रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी भेट घेऊन वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.
शहरातील अयोध्या नगरातील एका ७० वर्षीय पुरुष रुग्णाच्या हृदयाची काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी ८ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचा त्राससुद्धा रुग्णाला जडलेला होता. त्यानंतर रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात उपचारासाठी औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवण्यात आले. या ठिकाणी रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरू करण्यात आले. या रुग्णास महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. फुप्फुसाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे रुग्णास भूल देणे अतिजोखमीचे होते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याकामी परिश्रम घेतले. यासह वार्ड इन्चार्ज परिचारिका नीला जोशी, जोस्त्ना निंबाळकर, निशा गाढे, कविता राणे, ओटी असिस्टंट जितेंद्र साबळे, किशोर चांगरे, जतीन चांगरे, विजय बागुल, विवेक मराठे आदींनी उपचार करण्याकामी परिश्रम घेतले.