कोरोनाबाधित गर्भवती महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:44+5:302021-05-05T04:27:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दोन १९ वर्षीय ...

कोरोनाबाधित गर्भवती महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात दोन १९ वर्षीय गंभीर महिलांची सुखरूप प्रसूती केली. ही गर्भवती महिला कोरोनाबाधित असतानाही वैद्यकीय पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. यातील कोरोनाबाधित एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. तर दुसऱ्या एचआयव्ही आणि कोरोनाबाधित महिलेच्या पोटातील मृत गर्भ काढण्यात आला.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका कामगाराच्या १९ वर्षीय गर्भवती पत्नीला २६ एप्रिल रोजी अचानक आकडी आली आणि तोंडाला फेस आला. तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिची ऑक्सिजन पातळीदेखील खालावली होती. कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला. विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी प्रसूतीसाठी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. साडेआठ महिन्यांचा गर्भ असलेल्या महिलेची सुखरूप प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २ किलो १०० ग्रॅम होते.
माता व बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. बाळ कोरोना निगेटिव्ह आहे.
यासाठी भूलतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील, डॉ. काजल साळुंखे यांच्यासह स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. संतोष पोटे, डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. सुधीर पवनकर, बालरोग विभागाच्या डॉ. शैलेजा चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
जळगाव शहरातील एका गर्भवती महिलेला एचआयव्हीसह कोरोनाचीदेखील बाधा झाली होती. २८ एप्रिल रोजी तिची सोनोग्राफी झाली तेव्हा त्यात ३० आठवड्याच्या मृत गर्भांचे निदान झाले. श्वास घेण्यासही या महिलेला त्रास होता. या महिलेला ३० एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. संजय बनसोडे यांनी सुलभ प्रसूतीचा निर्णय घेतला व उपचार सुरू केले. ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता प्रसूती करण्यात आली. मात्र दुर्दैवाने बाळ पूर्वीपासूनच गर्भातच मृत होते. मात्र मातेचा जीव वाचला. विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. कांचन चव्हाण, डॉ. हेमंत पाटील, शीतल ताठे, परिचारिका नीला जोशी, लता सावळे यांनी प्रसूतीकामी परिश्रम घेतले.