विद्यार्थ्यांचा पेट्रोल टाकून आत्महनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:45+5:302021-08-13T04:21:45+5:30
अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून ...

विद्यार्थ्यांचा पेट्रोल टाकून आत्महनाचा प्रयत्न
अमळनेर : टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षातील नापास विद्यार्थ्यांबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थ्यांसहित पोलीस प्रशासनाची मोठीच धावपळ उडाली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील यांच्यासह सात विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, पोलीस यंत्रणा आणि विद्यार्थ्यांनी समयसूचकता दाखवत हातातील पेट्रोलच्या बॉटल वेळीच फेकल्याने पुढील अनर्थ टळला, दरम्यान आंदोलनाच्या दोन-अडीच तासांनंतर प्रभारी प्राचार्य पी.आर. शिरोडे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करत विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे भूषण भदाणे यांनी सांगितले.
विद्यार्थी आत्मदहन करणार म्हणून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात होता. विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला,व जोरदार घोषणाबाजी केली, दरम्यान पोलिसांची नजर चुकवून प्रथम भूषण भदाणे यांनी अंगावर पेट्रोल ओतले,त्याला सावरत असतानाच श्रीनाथ पाटील याने पेट्रोल ओतून घेतले, पोलीस यंत्रणेने वेळीच बॉटल हिसकावून विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात अनिरुद्ध शिसोदे,सागर राजपूत, भूषण पाटील या विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,त्यामुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील,अनंत निकम यांनी मध्यस्थी करत प्राचार्य शिरोडे आणि संचालकांशी चर्चा केली त्यांनतर प्राचार्य शिरोडे यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे, मात्र योग्य तो निर्णय न झाल्यास, महाविद्यालयाच्या आवारातून दोषींची प्रतिकात्मक गाढवावरून धिंड काढू असा इशारा भूषण भदाणे यांनी दिला आहे.
प्राचार्यांचे पत्र
चौकशी समिती नेमली विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात प्राध्यापकांकडून अनवधानाने काही चुका झाल्या आहेत असे आम्हाला कळले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देत आहोत. यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये महाविद्यालयाचे दोन प्रतिनिधी, विद्यापीठाचा प्रतिनिधी, शासनाचे दोन प्रतिनिधी, महाविद्यालयीन दोन विद्यार्थी प्रतिनिधी असे सदस्य असतील, असे लेखी पत्र प्राचार्य शिरोडे यांनी दिले आहे.