आज मध्यरात्रीपासून तीन दिवस जिल्हाभरात कडक निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:52+5:302021-03-27T04:16:52+5:30
जळगाव : जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आगामी होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन ...

आज मध्यरात्रीपासून तीन दिवस जिल्हाभरात कडक निर्बंध
जळगाव : जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता आगामी होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात तीन दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी मध्यरात्री बारा वाजेपासून मंगळवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा किराणा दुकान, किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री बंद राहणार आहे. केवळ दूध विक्री केंद्र, औषधी दुकाने सुरू राहणार असून औद्योगिक आस्थापना सुरू राहणार असल्या तरी त्यासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे होळी व धुलिवंदन निमित्त सामूहिक, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या समोर येत आहे. त्यात २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी धुलीवंदन सण साजरा करण्यात येणार आहे. या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता असल्याने यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीन दिवस कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दिले.
शनिवारी मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटं पासून अर्थात २८ मार्च पासून ३० मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत खडक निर्बंध लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
होळीचा रंग फिका
तीन दिवसांच्या या बंद मध्ये होळी व धुलीवंदन निमित्त सर्वच प्रकारच्या सामूहिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या होळीचा रंग फिका राहणार आहे.
यावर राहणार बंदी
सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार
किराणा दुकान व इतर सर्व दुकाने
किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्र
शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खाजगी कार्यालय
हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार असून केवळ होम डिलिव्हरी व सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरू राहील
सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व इतर कार्यक्रम,
शॉपिंग मॉल्स, मार्केट, स्पा, सलून, मद्य विक्री दुकाने,
बगीचे, पार्क, सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षक गृहे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संमेलन
पान टपरी, हातगाड्या, उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे
अत्यावश्यक सेवा वगळता इतर खाजगी प्रवासी वाहतूक
या सेवा राहणार सुरू
दूध विक्री केंद्र केवळ सकाळी सात ते संध्याकाळी सात
कायद्याद्वारे बंधनकारक असणाऱ्या पूर्वनियोजित वैधानिक सभा ऑनलाईन पद्धतीने घेता येतील
कोरोना लसीकरण
औद्योगिक अस्थापना सुरू राहतील मात्र संबंधितांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य
याशिवाय उपचार व सेवा, औषध विक्री दुकाने, रुग्णवाहिका सेवा व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाची संबंधित घटक यांना तसेच या कालावधीत पूर्वनियोजित परीक्षा असल्यास परीक्षार्थी व परीक्षेकरता नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना या निर्बंध आतून सुरू राहणार आहे.
या निर्बंधाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची संयुक्तरित्या राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
अर्थचक्र ही सुरू राहावे व आरोग्यही सांभाळले जावे
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सात दिवस किंवा पंधरा दिवस लाॅकडाऊन करावे अशी मागणी पुढे येत असली तरी जास्त दिवस निर्बंध घासल्यास आर्थिक घडी विस्कटून रोजगाराचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मोठ्या लॉकडाउन पेक्षा तीन दिवसांचे निर्बंध घालून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकमतला सांगितले. अर्थचक्रही सुरू रहाणे व आरोग्यही सांभाळले जावे अशी सांगड घालून नियोजनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.