भवानीपेठेत जुन्या वादातून तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:50+5:302021-08-21T04:20:50+5:30
जळगाव : जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली. या ...

भवानीपेठेत जुन्या वादातून तुफान हाणामारी
जळगाव : जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडली. या घटनेत दोन्ही गटांकडून धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला असून, दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्तियाज बागवान यांच्या फिर्यादीनुसार, भवानी पेठेतील रहिवासी इम्तियाज निसार बागवान (३९) यांचा होलसेल फळ विक्रीचा व्यवसाय आहे. चार दिवसांपूर्वी त्यांचा भाचा फैजल शफी बागवान याचे त्यांचा शेजारी राहणारा दानिश सिराज पिंजारी याच्यासोबत भांडण झाले होते. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते भांडण मिटविले होते. मात्र, १९ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास फैजल व दानिश यांच्यात पुन्हा वाद होऊन हाणामारी झाली. भाच्याला मारहाण होत असल्याचे कळताच, इम्तियाज यांनी भांडण सोडविण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली, परंतु सिराज पिंजारी, परवेज पिंजारी यांनी त्यांना पकडून ठेवले. नंतर दानिशने त्याच्या हातातील धारदार वस्तूने त्यांच्या कमरेवर भोसकले, तर सिबान रईस बागवान याला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, नंतर इम्तियाज यांच्या जबाबावरून दानिश सिराज पिजारी, सिराज पिंजारी, परवेज पिंजारी यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन लावत असताना मारहाण
दानिश पिंजारी यांच्या फिर्यादीनुसार, दानिश याचे पिझ्झा विक्रीचे दुकान असून, तो १९ रोजी रात्री आपली दुचाकी घरात लावत असताना इम्तियाज निसार बागवान, फैजल उर्फ राजू शफी बागवान, सिबान बागवान यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दानिशला मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणाचा आवाज ऐकून सिराज पिंजारी व परवेज हे त्या ठिकाणी आले असता, फैजल उर्फ राजू शफी बागवान याने त्याच्या हातातील धारदार पट्टीने सिराज पिंजारी याच्यावर वार केले, तर सिबान बागवान याने त्याच्या हातातील लोखंडी पाइपने परवेजच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले, तसेच पिंजारी यांची मोटारसायकल व चारचाकीचे तोडफोड करीत नुकसान केले. या प्रकरणी इम्तियाज निसार बागवान, फैजल उर्फ राजू शफी बागवान, सिबान बागवान यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.