टपरी लावण्यावरून तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:35+5:302021-09-23T04:19:35+5:30
७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल मेहुणबारे : जामदा गावात तणावपूर्ण शांतता चाळीसगाव : पूर्वीच्याच जागी टपरी लावण्याच्या कारणावरून ...

टपरी लावण्यावरून तुफान हाणामारी
७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मेहुणबारे : जामदा गावात तणावपूर्ण शांतता
चाळीसगाव : पूर्वीच्याच जागी टपरी लावण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना जामदा येथे मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी रात्री उशिरा दोन्ही गटातील ७० ते ७५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता गावात तणावपूर्ण शांतता आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जखमींपैकी दोन जणांना धुळे येथे तर एकाला चाळीसगाव येथे दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामदा येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने बांधकाम विभागाने रस्त्यावर असलेल्या टपऱ्या हटविल्या होत्या. आता रस्त्याचे काम झाल्यानंतर या टपऱ्या आणि दुकाने मूळ जागेवर लावण्यावरून वाद झाला आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
याप्रकरणी आबा महाले यांनी फिर्याद दिली. त्यावरून रवींद्र काकडे, धनराज काकडे, दीपक काकडे, सिताराम जाधव, गोपाल कोळी, बंटी सोनवणे, भाऊसाहेब चव्हाण, धोंडीराम चव्हाण, कृष्णा काकडे ,विशाल मोरे, सोनू काकडे, भोलेनाथ काकडे, माधव काकडे, कैलास मोरे, गणेश चव्हाण, पप्पू चव्हाण, जिभाऊ काकडे, प्रवीण जाधव, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर जाधव, भैय्या काकडे, राजेंद्र काकडे, वाल्मीक वाघ, रोहिदास सोनवणे, माधव मोरे, वंदना कोळी, मीना कोळी, रेखा काकडे, खलाबाई कोळी, रेखा कोळी, ताबाई सोनवणे, कासुबाई काकडे, मायाबाई काकडे,मंगलबाई कोळी इतर ६० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे रेखा काकडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून ज्ञानेश्वर अहिरे, लताबाई महाले, मोनाली महाले, ठगुबाई महाले, अशोक सोनवणे, आबा महाले, जितेंद्र महाले, प्रकाश सोनवणे, दिनेश सोनवणे, सुरेश महाले, संभाजी महाले, मुरलीधर महाले यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.