दगडी दरवाज्याचा ठेका रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:00+5:302021-09-24T04:21:00+5:30

दगडी दरवाज्याचा ठेका रद्द! वारंवार नोटिसा देऊनही कामात प्रगती नसल्याने कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : शहराची शान असलेल्या ...

Stone door contract canceled! | दगडी दरवाज्याचा ठेका रद्द!

दगडी दरवाज्याचा ठेका रद्द!

दगडी दरवाज्याचा ठेका रद्द!

वारंवार नोटिसा देऊनही कामात प्रगती नसल्याने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहराची शान असलेल्या ऐतिहासिक दगडी दरवाज्याच्या ठेकेदाराने वारंवार नोटिसा देऊनही कामात प्रगती केली नाही, म्हणून नगरपालिकेने त्याचा ठेका रद्द केला असून, नव्याने ठेका देण्यात येणार आहे.

दगडी दरवाज्याचा बुरूज पडल्यानंतर सराफा बाजारातील व धुळे चोपडा राज्य मार्गावरील वाहतूक काही महिने बंद होती. पुरातत्त्व विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याने माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाने दगडी दरवाजा १० वर्षे देखभाल दुरुस्तीसाठी अमळनेर पालिकेला सुपूर्द केला. पालिकेने हे काम अमन कन्स्ट्रक्शनला दिले होते. मात्र, बुरूज पाडून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात नव्हती. पुन्हा पावसाने बुरुजाचा काही भाग पडला होता. सराफा बाजारात जायला रस्ता नसल्याने व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते पंकज चौधरी, गोपी कासार यांच्यासह अनेकांनी काम वेगाने करण्याची मागणी केली होती. ठेकेदार चेतन शहा हे आजारी असल्याने काम थांबले होते. पालिकेनेदेखील अमन कन्स्ट्रक्शनला वारंवार नोटिसा दिल्या होत्या. तरी काम सुरू न झाल्याने पंकज चौधरी यांनी गुरुवारी २३ पासून आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत पुरातत्त्व विभागाकडेदेखील तक्रारी गेल्याने सहायक संचालक आरती आळे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ठेकेदार काम करत नसेल तर त्याला बदलण्याची मागणीही पुढे आली होती. याबाबत उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल असल्याचे समजते.

कोट

नागरिकांच्या भावनेची कदर करून ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य कायम राखले जाईल. स्थायी समितीत नव्याने ठेका देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

- पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर.

कोट

वारंवार नोटिसा देऊनही काम न केल्याने ठेका रद्द केला आहे. टेंडरमध्ये नंबर दोनवर असलेल्या ठेकेदारास अथवा नवे टेंडर काढून काम सुरू करण्यात येईल.

-प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अमळनेर

कोट

दगडी दरवाज्याचे काम होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. विलंब होऊ नये म्हणून नवे टेंडर न काढता दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदारास काम देण्यात यावे.

-पंकज चौधरी, तक्रारदार, बाहेरपुरा, अमळनेर

Web Title: Stone door contract canceled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.