पाणी पुरवठा व बांधकाम कर्मचाऱ्यांचा हातामध्ये अग्निशमन विभागाचे स्टेरींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:38+5:302021-03-04T04:27:38+5:30
अग्निशमनचे अप्रशिक्षित कर्मचारी ६० लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - मनपातील अग्निशमन विभागासह मनपातील सर्वच विभाग हे रामभरोसे सुरु आहेत. ...

पाणी पुरवठा व बांधकाम कर्मचाऱ्यांचा हातामध्ये अग्निशमन विभागाचे स्टेरींग
अग्निशमनचे अप्रशिक्षित कर्मचारी
६०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील अग्निशमन विभागासह मनपातील सर्वच विभाग हे रामभरोसे सुरु आहेत. मनपातील अनेक जागा रिक्त असल्याने कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही विभागाची जबाबदारी सोपविली जात आहे. यामुळे मनपाच्या अनेक विभागात सावळागोंधळ सुरु आहे. आता अग्निशमन विभागात पाणी पुरवठा व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात ९० टक्के कर्मचारी अग्निशमन विभागात काम करण्यासाठी सक्षम नसून, ठराविक कर्मचारीच प्रशिक्षित आहेत. अप्रशिक्षीत कर्मचाऱ्यांवर या विभागाचे काम सुरु आहे.
शहराच्या लोकसंख्येसोबतच शहराचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, शहराच्या वाढीव भागाच्या तुलनेत शहरात केवळ तीनच फायर स्टेशन आहेत. तसेच त्याठिकाणी देखील कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी असून, शहरात मोठी आगीची घटना घडल्यास अडचणी निर्माण होवू शकतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहरात काही फायरस्टेशन सुरु करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच मनपाच्या अग्निशमन विभागात अप्रशिक्षित कर्मचारीच जास्त असल्याने त्या अडचणीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण, मनपाच्या अग्निशमन विभागात बांधकाम व पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागातील मंजूर व रिक्त पदे
पद - मंजूर पद - रिक्त
अग्निशमन अधिकारी - १ - १
स्थानक अधिकारी - ३ - ३
सहाय्यक स्थानक - ६ - ६
पर्यवेक्षक वाहन चालक - ६ - ०
लिडींग फायरमन - ६ - ६
फायरमन - ६ - ५
आकृतीबंध मंजूर नसल्याने अडचणी
- मनपातील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसह एकूण ११०० हून अधिक पद रिक्त आहेत. त्यात प्रत्येक महिन्यात वाढ होत असून, अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.
- मनपात प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक विभागात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याकडे वर्ग २ चे काम आहे. तर काही विभागात वर्ग २ च्या कर्मचाऱ्याला वर्ग १ चे देखील काम देण्यात आले आहे.
- मनपातील रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे अनेक वर्षांपासून आकृतीबंध पाठविण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून मंजुरी न मिळाल्याने रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.
६६ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ६ कर्मचारीच प्रशिक्षीत
- मनपाच्या अग्निशमन विभागात एकूण ६६ कर्मचारी आहेत. त्यापैकी केवळ ६ कर्मचारी प्रशिक्षित आहेत. ६० कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.
- या विभागात आरोग्य विभागातील कर्मचारी घेता येत नाही. त्यामुळे अग्निशमन विभागात बांधकाम व पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा भरणा करण्यात आला आहे.
- १० ते १५ कर्मचारी पहिल्यांदाच या विभागात दाखल झाले आहेत. तसेच त्यांना कोणतेही प्रशिक्षण देखील देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत शहरात मोठी घटना घडल्यास अनेक अडचणी निर्माण होण्याची भिती आहे.
- तसेच एकच फायरमन असल्याने घटनास्थळी अनेक चुका या नवख्या व अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून होण्याची भिती असते.
- अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक विभाग म्हणून कार्यरत असतो, या विभागात तरी मनपा प्रशासनाने प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची वर्णी लावण्याची गरज आहे.
कोट..
मनपातील अनेक जागा रिक्त आहेत. मनपाचा आकृतीबंध तयार झाला आहे. तसेच तो शासनाकडे मंजुरीसाठी देखील पाठविण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने अनेक जागा रिक्त आहेत. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर सर्वच विभागातील अडचणी संपतील.
-शशिकांत बारी, अग्निशमन विभाग, प्रमुख