गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचे जागते रहो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:18+5:302021-09-05T04:21:18+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्याचा इतिहास पाहता गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगार, उपद्रवी, तसेच गणेशोत्सवाच्या मागील काळात रेकॉर्डवर आलेल्यांवर ...

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांचे जागते रहो !
जळगाव : जळगाव जिल्ह्याचा इतिहास पाहता गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगार, उपद्रवी, तसेच गणेशोत्सवाच्या मागील काळात रेकॉर्डवर आलेल्यांवर विशेष नजर ठेवण्यासह कोणत्याही किरकोळ घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यासाठी पोलिसांनी २४ तास अलर्ट राहावे अशा सूचना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी शनिवारी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.
नाशिक परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर शेखर शनिवारी प्रथमच जळगाव दौऱ्यावर आले. सर्वांत आधी त्यांनी मंगलम सभागृहात जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यांमधील गोपनीयचे अंमलदार व जिल्हा विशेष शाखेचे अधिकारी, अंमलदार यांची संयुक्त बैठक घेतली. यात त्यांनी दोन्ही विभागाच्या अमलदारांनी कर्तव्याची जाणीव करून देतानाच हा विभाग पोलीस दलाचे नाक, कान व डोळे याची भूमिका बजावणारा महत्त्वाचा व संवेदनशील आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक हालचाल ही गोपनीय विभागाला मिळालीच पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने खबऱ्यांचे नेटवर्क तयार करावे. या विभागावर कायदा व सुव्यवस्थेची मदार असते. त्यामुळे पोलीस दलाला घटनेपूर्वीच पावले उचलणे शक्य होते असे सांगून आतापासूनच आपल्या कार्यक्षेत्राची माहिती तयार ठेवण्याचे आदेश दिले. दुपारच्या सत्रात त्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था, तसेच गुन्हेगारीचा आढावा घेतला. मालमत्ता व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात खबरदारी घेऊन शक्यतो काही घटना रोखणे पोलिसांना सहज शक्य होते, त्यादृष्टीने नियोजन करता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सचिन गोरे व्यासपीठावर होते.
रावेर, भुसावळात आज जनतेशी संवाद
रावेर व भुसावळ या अतिसंवेदनशील शहरात बी.जी. शेखर रविवारी थेट जनता व मोहल्ला कमिटीशी संवाद साधणार आहेत. सर्वांत आधी ११ वाजता रावेर येथे बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी भुसावळात बैठक होणार आहे. गणेशोत्सव व पोळा या सणांवर कुठलेही सावट नसावे, शांततेत उत्सव साजरा करण्यासाठी जनतेला काय वाटतं, त्यावर त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.