राज्य शासनाची सापत्न वागणूक
By Admin | Updated: October 9, 2014 15:02 IST2014-10-09T15:02:17+5:302014-10-09T15:02:17+5:30
राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत.

राज्य शासनाची सापत्न वागणूक
जळगाव : राजकीय वैमनस्यापोटी षडयंत्र रचून आमदार सुरेशदादा जैन यांना जळगावबाहेर ठेवण्याची विरोधकांची खेळी यशस्वी झाल्याने गेली अडीच वर्ष आमदार सुरेशदादा जळगावबाहेर आहेत. परिणामी शासनस्तरावर जळगावचे प्रश्न, अडचणी मांडण्यासाठी सक्षम नेताच नसल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे.
सुरेशदादांनी विकास केला
शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आमदार सुरेशदादांनी दूरदृष्टी ठेवून वाघूर योजना केली नसती तर उन्हाळ्यात जळगावकरांना शहर सोडून जाण्याची वेळ आली असती. उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये १५-२0 दिवसांआड पाणीपुरवठा होत असताना जळगावमध्ये मात्र दोन दिवसांआड पाणी मिळाले. दादांनी जळगावचा विकास केला. इतर जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाहिले तर इतका नियोजनबद्ध विकास झालेला दिसत नाही.
..तर जळगावचे होईल सिंगापूर
मनपाला निधीचा प्रश्न आहे. जनतेवर भार पडू न देता विकास करण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना ओढून आणणे गरजेचे आहे. मात्र आमदार सुरेशदादांसारखेच सक्षम नेतृत्वाची अनुपस्थिती तिव्रतेने जाणवत आहे. रमेशदादा, नितीन लढ्ढा यांनी केंद्रशासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत २२00 कोटींचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्याची मंजुरी रखडल्याने या योजनांचा खर्च आज सुमारे ५ हजार कोटींवर पोहोचला आहे. विमानतळ शोभेचे शहराचा विकास करावयाचा असेल तर दळणवळण सेवा सहज उपलब्ध असणे आवश्यक असते. त्यातही विमानतळ असणे सर्वात महत्त्वाचे असते. ते असेल व त्यावर विमानसेवा सुरू असली तर मोठे उद्योग शहरात आणणे शक्य होईल, हे लक्षात घेऊनच आमदार सुरेशदादांनी मनपाच्या कर्तव्यात नसतानाही विमानतळ योजना हाती घेण्याची सूचना केली. नंतर शासनाने ही योजना परत मागितली तर त्यामार्गे लवकर पूर्ण व्हावी म्हणून ती शासनाला आडकाठी न आणता परतही केली. त्यामुळेच विमानतळाचे काम मार्गी लागले. मात्र ते या विमानतळाच्या उद््घाटन समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर तर अडीच वर्ष ते जळगावबाहेरच आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या अडीच वर्षात या विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्याला त्यासाठी पाठपुरावा करण्याची इच्छा झाली नाही किंवा पाठपुरावा करणे जमले नाही.
-----------
आमदार सुरेशदादांच्या अनुपस्थितीत राज्य शासनाने मनपाला सापत्नपणाची वागणूक देत अनेक विकास कामांमध्ये अडथळे आणले. मात्र जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने याबाबत शासनाला जाब विचारला नाही. मार्केट कराराच्या विषयांना दरवेळी स्थगिती देत हुडको कर्जफेडीचा मार्ग बंद करण्यात आला. त्याबाबत जाब विचारण्यासाठीही आमदार सुरेशदादांची उणीव तिव्रतेने जाणवली. विरोधकांनी केवळ अडथळे आणण्याचे काम केले.