शाळा सुरु करा पण विद्यार्थींची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST2021-01-19T04:18:46+5:302021-01-19T04:18:46+5:30

जळगाव : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, ...

Start school but take care of students | शाळा सुरु करा पण विद्यार्थींची काळजी घ्या

शाळा सुरु करा पण विद्यार्थींची काळजी घ्या

जळगाव : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीमधील मुले लहान असल्यामुळे पालकांमध्ये धाकधूक कायम असली, तरी पालकांनी निर्णयाचा स्वागत केला आहे. मात्र, शाळांनी कोरोना विषयक संपूर्ण काळजी घेवूनच शाळा सुरू कराव्यात, अशी प्रतिक्रिया पालक वर्गातून समोर आली आहे.

नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे असतानाही, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पालकांमध्ये धाकधूक कायम होती. त्यानंतर मात्र, शाळा नियमित सुरू असून कुठलाही विद्यार्थी बाधित आढळून आलेला नाही. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरू करण्याबाबत मान्यता देण्यात आल्याबाबत सोमवारी शासनाचे पत्र शिक्षण विभागाल प्राप्त झाले आहे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी यांना पूर्वतयारी संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत़ जळगाव जिल्ह्यात मागील काही महिन्यांच्या तुलनेत सद्यस्थितीला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरी सुध्दा पाचवी ते आठवी वर्ग सुरू झाल्यानंतर कुणालाही कोरोनाची लागण होणार नाही, यासाठी सॅनिटाईज करणे, मास्क लावणे या नियमांचे पालक होणे गरजेचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पाचवी व सहावीची मुले लहान आहेत, त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, शाळा सुरू होत असल्याचा निर्णयाचा पालक वर्गाकडून स्वागत करण्यात आला आहे.

पालकांना काय वाटते ?

पाचवी ते सहावीची मुले लहान आहेत़ त्यामुळे कोरोना विषयक सतर्कता पाळणे आवश्यक आहे. शाळा सुरू होत आहेत, याचा आनंद आहे़ कधी मोबाईल नसतो म्हणून काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. आता वर्ग सुरू होतील. त्यामुळे त्यांना संपूर्ण शिक्षण मिळेल. मात्र, पालकांनी पाल्यास साधा ताप सुध्दा असेल तर शाळेत पाठवू नये.

- नितीन कोष्टी, पालक

------------------------

शाळा सुरू होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. पण, शाळांनी आवश्यक ती खबरदारी घ्यायल्या हवी. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर पाळणे अत्यंत महत्वाचे आहे, यासोबत इतर कोरोनाविषयक नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून व्हायला हवे.

- साधना सुरळकर, पालक

-----------------------

सॅनिटाईज करणे, मास्क लावणे यासह सामाजिक अंतर पाळणे या नियमांचे शाळेत पालन झाले पाहिजे. पाल्यास शाळेत पाठविण्यास संमती आहे. जेवणाच्या सुटीत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर पाळले जावे हे सुध्दा आवश्यक आहे़ त्यामुळे शाळा प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.

- दीपाली चव्हाण, पालक

------------------------

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाचे पत्र प्राप्त झाले आहे़ रविवारीच पूर्वतयारीबाबत गटशिक्षणाधिकारी यांची बैठक घेतली असून आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत़ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने काय काळजी घ्यावी, याबाबतही शाळांना सूचना केल्या जातील़

- बी.एस.अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प. शिक्षण विभाग

-------------------------------

५० टक्के विद्यार्थी उपस्थित

नववी ते बारावीच्या वर्गाना सुरूवात होवून महिना उलटला आहे. ५० टक्के विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष हजर राहत आहेत. इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात असून प्रत्यक्ष उपस्थित राहणा-या विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत असून कुठलाही विद्यार्थी बाधित आढळून आलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Web Title: Start school but take care of students