भुसावळ शहरात एलईडी दिवे बसविण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:50 IST2018-09-02T21:49:25+5:302018-09-02T21:50:23+5:30
वीज बिलात होणार ५० टक्के बचत : कंपनी करणार सात वर्षे दुरुस्ती

भुसावळ शहरात एलईडी दिवे बसविण्यास प्रारंभ
भुसावळ, जि.जळगाव : गेल्या काही वर्षांपासून शहरातील पथदिव्यांची झालेली दुरवस्था व वीज बचतीच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत्यातील कंपनीला शहरातील पथदिव्यांच्या कामांबाबत नुकताच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने करार करण्यात आला होता. हे पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी रोजी करण्यात आला.
शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात जुन्या ट्यूब काढून ३५ ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारितील कंपनीकडून पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ सकाळी १० वाजता करण्यात आला.
या वेळी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, शिक्षण समिती सभापती अॅड.बोधराज चौधरी, नगरसेवक किरण कोलते, चंद्रशेखर अत्तरदे, माजी नगरसेवक वसंत पाटील, माजी नगरसेवक परिक्षित बºहाटे, गिरीश महाजन, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे, बुथ विस्तारक दिनेश नेमाडे, प्रा. प्रशांत पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे यांच्यासह कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गजानन मंदिर भागात पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने मंदिर पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांचा सत्कार केला.
बिघाड २४ तासात निकाली
शहरात नव्याने बसविण्यात येणाऱ्या या पथदिव्यांमुळे पालिकेच्या वीज बिलात ५० टक्के बचत होणार आहे. शिवाय कंपनी सात वर्षे पालिकेला ही सुविधा पुरविणार आहे. तसेच शहरातील पथदिव्याचा बिघाड २४ तासात निकाली काढण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे .